देगावातील अडीच हजार हेक्टर सिंचनाखाली आणणार : गुलाबराव पाटील | पुढारी

देगावातील अडीच हजार हेक्टर सिंचनाखाली आणणार : गुलाबराव पाटील

कोडोली; पुढारी वृत्तसेवा :  देगाव पंचक्रोशीतील जी गावे आहेत त्या गावातील अडीच हजार हेक्टर जमीन सिंचन योजनेतून ओलिताखाली आणली जाईल. त्यातून जनसामान्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले जाईल, अशी ग्वाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. दरम्यान, आ. महेश शिंदे यांनी कोरोनाच्या काळात लोकांचे जीव वाचवले. आता पाण्याच्या दानासाठी लोकांसाठी ते रात्रीचा दिवस करत आहेत, असे गौरवोद्गारही मंत्री पाटील यांनी काढले.

देगाव, ता.सातारा येथे जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर जवळपास 14 कोटी रुपये खर्चाच्या नळपाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. महेश शिंदे, बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे, माजी जि.प. सदस्य संदीप शिंदे, अर्चना देशमुख, रेखाताई शिंदे, माजी पं.स. सदस्य रामदास साळुंखे, प्रवीण धस्के, दादा जाधव, शेडगे, विजय काळे, राहूल बर्गे, दत्तात्रय शिंदे, देगाव सरपंच, उपसरपंचासह मान्यवर उपस्थित होते.

ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस केवळ टिका करण्यातच मग्न आहेत. त्यांच्याकडे दुसरे काही उरले नाही. खोके म्हणून टिका करण्याशिवाय त्यांच्या हाती काय शिल्लक राहिले नाही. संजय राऊत नुसतीच बडबड करत आहेत. मात्र, त्यांना आम्ही निवडून दिले आहे. आमच्यावर टिका करायचा त्यांना अधिकारही नाही. आ. महेश शिंदे यांनी कोरोनात जनतेचे जीव वाचवले आणि आता पाण्याच्या दानासाठी रात्रंदिन काम करत असल्याने जनता आ. महेश शिंदे यांच्या पाठीमागे उभी असल्याचे पाहून अभिमान वाटतो, असे सांगत ना. पाटील यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टिका केली.

ना. पाटील म्हणाले, देगाव भागातील जनतेसाठी जलजीवन मिशन अंतर्गत सौर उर्जेवर चालणारी 24 बाय 7 पाणी पुरवठा योजना येत्या काही काळात पूर्णत्वास जाईल. त्याच बरोबर देगाव पंचक्रोशीतील जी गावे आहेत त्या गावातील अडीच हजार हेक्टर जमीन सिंचन योजनेतून ओलिताखाली आणली जाईल, असे ठोस आश्वासन पाटील यांनी दिले.

आ. महेश शिंदे म्हणाले, गेली अनेक वर्षे झाले देगावचा पाणी प्रश्न अत्यंत बिकट होत चालला होता. येथील नागरिकांनी हा प्रश्न माझ्यासमोर मांडला. तो प्रश्न सोडवण्यासाठी येथील जनतेने पुढाकार घेतला. ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन घडवून आणले. त्यांना दिलेला शब्द मी पाळला आणि गावच्या पाणी पुरवठा योजनेसाठी जवळपास 14 कोटीची सौर उर्जेवर चालणारी जलजीवन मिशन अंतर्गत शुध्द, स्वच्छ, फिल्टर पाणी पुरवठा योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंजूर करून आणली. आज या योजनेचे भूमीपूजनही पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी केले. हे आपणा सर्वांचे भाग्य आहे. आता आपण एवढ्यावरच थांबणार नाही तर देगाव पंचक्रोशीत येणारी गावे, वाड्या वस्त्या यांची जवळपास अडीच हजार हेक्टर जमीन सिंचन योजनेतून ओलिताखाली आणली जाईल. त्यासाठी मंत्रालयात संबंधित विभागाचे लोकप्रतिनिधी व आधिकारी यांच्यासमवेत मिटिंगही घेतली असून लवकरच सिंचनाचाही प्रश्न मार्गी लागेल. पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने आ. महेश शिंदे यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सुत्रसंचलन संतोष कणसे यांनी केले. आभार राहूल पवार यांनी मानले.

Back to top button