सातारा : वीज चोरी करणार्‍यांकडून दीड कोटींचा दंड | पुढारी

सातारा : वीज चोरी करणार्‍यांकडून दीड कोटींचा दंड

सातारा; पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागात तर आजही आकडा टाकून वीजचोरी केली जाते. अशा वीज चोरांवर महावितरणकडून वेळोवेळी कारवाईचा बडगा उगारला जातो. महावितरण विभागाने एप्रिल 2021 ते आज अखेर विजेचा गैरवापर करणार्‍या जिल्ह्यातील 222 ग्राहकांकडून तब्बल 38 लाख 22 हजारांचा दंड वसूल केला आहे. तर आकडा टाकून वीज चोरणार्‍या 1 हजार 86 ग्राहकांकडून 1 कोटी 12 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

वीज ही प्राथमिक गरज आहे. त्यामुळे महावितरण विभागाकडून ग्राहकांना अखंड वीजपुरवठा केला जातो. काही तांत्रिक बिघाड झाल्यास तातडीने देखभाल दुरुस्तीदेखील केली जाते. असे असतानाही अनेक ग्राहकांकडून वीज चोरी हेात आहे. अशा वीज चोरीची तपासणी करण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. महावितरण विभागाने एप्रिल 2022 पासून जिल्ह्यात 7 हजार 10 ग्राहकांची तपासणी केली असता 222 ठिकाणी विजेचा गैरवापर आढळून आला. अशा ग्राहकांकडून 38 लाख 22 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याचबरोबर विद्युत वाहिनीवर आकडा टाकून तसेच मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करणार्‍या जिल्ह्यातील एक हजार 86 ग्राहकांवर महावितरणने कारवाई केली आहे. महावितरणच्या नोंदणीनुसार संबंधित ग्राहकांनी तब्बल 9 लाख 8 हजार 38 युनिट विजेची चोरी केली. या वीजचोरीपोटी ग्राहकांकडून एकूण 1 कोटी 12 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

दरम्यान, घरगुती कनेक्शन असताना व्यावसायिक किंवा औद्योगिक कारणासाठी वापर करणे म्हणजे विजेचा गैरवापर करणे होय. असे करणे कायद्याने गुन्हा आहे. तरी देखील अनेक ग्राहक विजेचा गैरवापर करतात. अशा ग्राहकांना पुढे कारवाईला सामोरे जावे लागत आहे.

Back to top button