साताऱ्यातील कास पठार फुलले; यवतेश्वर घाटात कोंडी | पुढारी

साताऱ्यातील कास पठार फुलले; यवतेश्वर घाटात कोंडी

सातारा; पुढारी वृत्तसेवा: शनिवार आणि रविवार या सलग सुट्ट्यांमुळे साताऱ्यातील कास पठार व परिसराला रविवारी ४ हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. त्यामुळे कास रस्त्यासह पठारावर सर्वत्र नागरिकांची वर्दळ दिसून आली.

ऑनलाईनचा कोटा पूर्ण झाल्यानंतरही दिवसभर पर्यटकांची आवक जास्त असल्याने पठार फुलून गेले.

पर्यटकांमुळे वाहनांची गर्दी जास्त झाल्याने यवतेश्वर घाटात काही किलोमीटरच्या रांगा लागल्या. त्यामुळे पोलिसांना कसरत करावी लागली.

मुंबई, पुण्याकडे जाणार्‍या वाहनांची सातारा शहरातील वाहतूक बंद करून ती बोगदा-शेंद्रेमार्गे वळवावी लागली.

गत महिन्यात कास पठारावर काही प्रमाणात फुलांचे गालिचे तयार झाल्यानंतर दि. २५ ऑगस्ट रोजी हंगाम सुरू झाला होता.

पहिले सात दिवस ऑनलाईन प्रवेश बंद होता. मात्र, १ सप्टेंबरपासून ऑनलाईन नोंदणी करून पर्यटकांना प्रवेश देण्यात आला.

कास पठारावर २००हून अधिक दुर्मिळ फुले येतात.

यंदाच्या हंगामात सुरूवातील फुलांची संख्या कमी राहिली.

त्यानंतर ऊन-पावसाचा खेळ सुरू झाल्यानंतर हंगाम बहरू लागला आहे.

सध्याच्या घडीला कास पठार बहरले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पठारावर पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे.

कास रस्ता वर्दळू लागला आहे. काससह ठोसेघर, सज्जनगड, बामणोली, उरमोडी, कण्हेर धरण या भागात पर्यटक जात असल्याने रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे.

सलग सुट्ट्यांचा योग साधून रविवारी मोठया प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली.

कास पठारासह परिसरातील पर्यटनस्थळांना भेट दिली. त्यामुळे बोगद्यातून जाणारा सज्जनगड व कास रस्त्यावर वाहनांची वर्दळ झाली होती.

दिवसभर पर्यटकांची ये-जा सुरू असल्याने सायंकाळी यवतेश्वर घाट, बोगदा परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. त्याचा ताण सातार्‍यातील अंतर्गत रस्त्यावर आला होता.

वाहतूक कोंडी झाल्यानंतर वाहतूक पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली.

रविवारी सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे दुपारपासून वाहनांनी कास रस्ता फुलून गेला होता.

शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशीही वाहतूक पोलिसांनी तपासणी केली.

दिवसभर कास व बामणोलीकडे जाणार्‍या वाहनांची संख्या जास्त असल्याने सायंकाळी मात्र, यवतेश्वर घाट, सज्जनगड रस्ता व बोगद्यात वाहनांची कोंडी झाली होती.

ऑनलाईन बुकींग फुल झाल्यानंतरही पठारावर पर्यटकांची वर्दळ

सज्जनगड, उरमोडी व कण्हेर धरण परिसर, बामणोली या भागात पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, कर्नाटक, तसेच अन्य जिल्ह्यासह राज्यातून पर्यटक दाखल झाले होते.

वाहनांची संख्या जास्त असल्याने कास रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती.

कास पठारावर असणार्‍या पार्किंगमध्ये वाहने लावण्यास जागाच नव्हती. ऑनलाईन पद्धतीने दररोज ३ हजार पर्यटकांना प्रवेश दिला जातो. रविवारी मात्र, ऑनलाईन बुकींग फुल झाल्यानंतरही मोठ्या संख्येने पर्यटक पठारावर दाखल झाले होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button