ठाणे : गायमुख घाटात विचित्र अपघात; ३ जण जखमी - पुढारी

ठाणे : गायमुख घाटात विचित्र अपघात; ३ जण जखमी

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : घोडबंदर रोडवरील गायमुख घाटात विचित्र अपघात झाला. यावेळी एकाच गाडीत तीन जण अडकून पडले होते. तर या अपघातात पाच गाड्यांचे नुकसान झाले आहे. अडकून पडलेल्यांमध्ये कारचालक विनोद खरात (वय ३०) यांच्यासह सृष्टी पाटील (१८) आणि पांडुरंग पाटील (४५) या तिघांची जवळपास काही तासांमध्ये सुटका करण्यात आली. त्यांना मीरा भाईंदर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. गायमुख घाटात विचित्र अपघात हा काल (रविवार) रात्री १०.२० वाजण्याच्या सुमारास घडला. दरम्यान या अपघातात रस्त्यावर तेल सांडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

चालकाचा टँकरवरील ताबा सुटला

रविवारी रात्री १०.२० वाजण्याच्या सुमारास मे पारस पेट्रो प्रा. लि.च्या मालकीचा ऑईलने भरलेला टँकर ठाण्याच्या दिशेने येत होता. त्यावेळी चालकाचा टँकरवरील ताबा सुटला.

यावेळी घोडबंदरकडे जाणाऱ्या एक ट्रकसह तीन चारचाकी वाहनांवर गायमुख घाटात घोडबंदरकडे जाणाऱ्या वाहिनीवर हा ट्रक जाऊन आदळला.

या अपघातामध्ये एका कारमध्ये तिघे जण अडकून पडले होते.

प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग तातडीने घटनास्थळी

या अपघाताची माहिती मिळताच कासारवडवली पोलिसांसह वाहतूक पोलीस, ठाणे व मीरा भाईंदर या दोन्ही महापालिकांचे अग्निशमन दल आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच या अपघातात कोणी जखमी झाले आहे का? याची पाहणी केली.

त्यावेळी एका गाडीत तिघे अडकल्याचे समजताच त्यांच्या सुटकेसाठी तातडीने प्रयत्न सुरू केले आणि त्यांची काही तासात यशस्वीपणे सुटका केली.

त्या तिघांना गंभीर दुखापत झाली असल्याने उपचारासाठी मीरा भाईंदर येथील भक्ती वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघातात तीन कार, एक ट्रक आणि टँकरचे नुकसान झाले आहे.

यावेळी ठाणे अग्निशमन दलाचे दोन इर्मजन्सी टेंडर, एक फायर वाहन, एक क्यूआरव्ही, मीरा भाईंदर अग्निशमन दलाचे एक फायर इंजिन, एक क्रेन, तीन हायड्रा, एक जेसीबी, तीन रुग्णवाहिकांना पाचारण केले होते, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

Back to top button