लोणंद : रेल्वेच्या धडकेत अंदोरीतील बापलेकाचा दुर्दैवी अंत | पुढारी

लोणंद : रेल्वेच्या धडकेत अंदोरीतील बापलेकाचा दुर्दैवी अंत

लोणंद, पुढारी वृत्तसेवा : लोणंद रेल्वे स्टेशननजीक रेल्वेच्या धडकेत अंदोरी (ता. खंडाळा) येथील एसआरपीमध्ये कार्यरत असणारे शैलेश बोडके आणि त्यांचा एक वर्षांचा मुलगा यांचा दुर्दैवी अंत झाला.

पुणे-मिरज मार्गावरील लोणंद रेल्वे स्टेशननजीक रविवारी सांयकाळी बेंगलोर-जोधपूर एक्सप्रेस रेल्वे (गाडी नंबर ०६५०६) या रेल्वेच्या धडकेमध्ये अंदोरीतील एसआरपीमध्ये कार्यरत असलेले शैलेश ज्ञानेश्वर बोडके (वय -२८) आणि त्यांचा एक वर्षाच्या मुलाचा कु. रुद्र बोडके यांचा दुर्देवी मृत्यु झाला आहे.

या घटनेची नोंद सातारा रेल्वे पोलीस स्टेशनला करण्याचे काम रात्री उशिरापर्यत सुरु होते. या घटनेबाबत रेल्वे पोलिसांकडून आणि घटना स्थळावरून मिळालेली आधिक माहिती अशी की, अंदोरी (ता. खंडाळा) शैलेश बोडके हे  धुळे येथे एसआरपीमध्ये कार्यरत आहेत.

त्यांची पत्नी मुंबई पोलिसदलामध्ये आहे. शैलेश बोडके हे सुट्टी घेऊन दोन दिवसांपूर्वी अंदोरी येथे घरी आला होता. शैलेश बोडके हे त्यांच्या रुद्र बोडके या एक वर्षाच्या मुलासह रविवारी सांयकाळी लोणंद रेल्वे स्टेशनवर गेले असता बेंगलोर-जोधपूर एक्सप्रेस या रेल्वेच्या धडकेमध्ये त्यांच्या मृत्यू झाला.

या घटनेनंतर सपोनि व्ही. आर. पाटोळे, आदीनाथ भोसले व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेचा पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यत सुरु होते. या घटनेत बापलेकाचा दुर्देवी मृत्यू झाला असल्याने अंदोरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पहा व्हिडीओ : अलका कुबल-आठल्ये यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला पुढारीची टिम भेटीला..!

Back to top button