

लोणावळा ; पुढारी वृत्तसेवा : लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ इंदूर-दौंड एक्स्प्रेसचे दोन डबे घसरले. यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली. हा प्रकार आज (सोमवार) सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
इंदूर-दौंड एक्स्प्रेसचे दोन डबे घसरले हे समजताच रेल्वे प्रशासनाने रेल्वेचे डब्बे रूळावर आणण्याचे काम युध्दपातळीवर सुरू केले आहे. दरम्यान रेल्वेचे डबे पूर्ववत रूळावर बसवले असून, गाडी मार्गस्थ केली आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे.
मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर हा अपघात झाला. इंदूर-पुणे रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले. लोणावळा रेल्वे स्टेशन जवळ पावणे आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबईहून पुण्याला ही रेल्वे निघाली होती, तेंव्हा लोणावळा स्टेशनवरील एक नंबर प्लॅटफॉर्मवर रेल्वे थांबताना अचानक दोन बोगी घसरल्या. रेल्वेच्या मागच्या बाजूच्या या दोन्ही बोगी होत्या. त्यात प्रवासी देखील होते. पण थांबविण्याच्या उद्देशाने रेल्वेचे स्पीड कमी केल्याने मोठी दुर्घटना टळली. सर्व प्रवासी सुखरूप आहेत.