अंड्याचे दर वाढले; खवय्यांची मागणी कायम | पुढारी

अंड्याचे दर वाढले; खवय्यांची मागणी कायम

सातारा : गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वढल्याने पौष्टिक आहारामध्ये अंड्यांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे अंड्यांची मागणी वाढली असून दर मात्र वाढले आहेत. मागील महिन्यात ४५० रुपये शेकड्याने मिळणारी अंडी ६०० रुपये शेकड्यावर पोहोचल्याने खवय्यांना महागाईचा फटका बसत आहे. सर्वात जास्त प्रोटिन्स व उष्मांक अंड्यापासून मिळत असल्याने आरोग्यदायी दैनंदिनीमध्ये अंड्यांची मागणी कायम आहे.

कोरोना महामारीपासून नागरिकांमध्ये आरोग्य व आहाराबाबत जागृती वाढली आहे. आरोग्यदायी आहार घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अंडी व मांसाहाराला प्राधान्य दिले जात आहे. कोरोना काळात अनेक शाकाहारी नागरिकांनी अंडे खायला सुरुवात केली.

परिणामी खवैय्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यातच मागील पंधरा दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. वाढत्या थंडीत आहारावर जोर दिल्यास प्रकृती व आरोग्य सुधारते. अनेकजण शरीर कमावण्यासाठी हिवाळ्यात प्रयत्नशील राहतात. त्याचाच भाग म्हणून नाष्ट्यामध्ये दररोज अंड्याचा समावेश केला जात आहे. तसेच बहुतांश चायनीज पदार्थांमध्ये अंड्याचा वापर होत असून या पदार्थ्यांना खवैयांची पसंती राहत आहे. परिणामी अंड्यांना मागणी वाढली असून पुरवठा अपुरा पडू लागला आहे. अंड्याचे दर वाढले आहेत.

नोव्हेंबर अखेरपर्यंत ४५० रुपये शेकडा मिळणारी अंडी आता ६०० ते ६५० रुपये शेकडा मिळू लागली आहेत. गावरान अंड्यांचेही दर कडाडले आहेत. वाढती महागाई, पशुखाद्याची दरवाढ, अपुरे मनुष्यबळ यामुळे जिल्ह्यातील अनेक पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आल्याने बंद पडले आहेत. त्यामुळे जिल्ह्या बाहेरुन तसेच दक्षिणेकडील राज्यांमधून अंडी विक्रीसाठी येतात. याचाही अंड्यांच्या दरावर परिणाम झाला असून दर भडकले आहेत. सर्वसामान्यांसह अंडीप्रेमी खवैय्यांना वाढत्या महागाईचा फटका बसत आहे. मात्र आरोग्याशी तडजोड करणे हिताचे नसल्याने अंड्यांना मागणी कायम आहे.

Back to top button