सातारा : तळबीड येथे महिलेचा दगडाने ठेचून खून करणाऱ्यास अटक | पुढारी

सातारा : तळबीड येथे महिलेचा दगडाने ठेचून खून करणाऱ्यास अटक

तासवडे टोलनाका; पुढारी वृत्तसेवा :  चोरीच्या उद्देशाने तळबीड (ता. कराड) येथे महिलेचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली होती. दरम्यान, या प्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व तळबीड पोलिसांनी तपास करत अवघ्या चार तासात संशयितास अटक केली. सुरज शरद मोहिते (रा. मानकर वस्ती – तळबीड, ता. कराड) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, तळबीड येथील मानकर वस्तीवर विमल कृष्णत चव्हाण या महिलेचा गुरुवारी दिवसा सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास खून करण्यात आला होता. घटना गंभीर असल्यामुळे पोलिसांनी तात्काळ तपासास सुरुवात केली. सातारा येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर पथकासह तळबीड येथे तातडीने दाखल झाले. त्यांच्यासह तळबीड पोलीस ठाण्याच्या सपोनि जयश्री पाटील यांनी तपासाची दिशा निश्चित करत संशियताचा शोध सुरु केला. पोलिसांनी फिर्यादी तसेच आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली असता, फिर्यादीच्या घराजवळच राहणाऱ्या एका इसमाचे व मयत विमल चव्हाण यांचे बुधवारी दारू पिण्याकरता पैसे मागण्यावरून भांडण झाल्याची माहिती मिळाली. त्यावेळी मयत विमल चव्हाण यांनी पैसे दिले नव्हते. त्याच दिवशी संध्याकाळी मयत विमल चव्हाण यांनी संशयिताबरोबर भांडण झाल्याचे मुलगा प्रकाश चव्हाण यांना सांगितले होते. खून झाल्यानंतर फिर्यादी यांनी मयत विमल चव्हाण यांच्या गळ्यातील सोन्याची एक तोळ्याची बोरमाळ, कर्णफुले चोरीस गेल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी जवळच असलेल्या उसाच्या शेतात लपून बसलेल्या संशयितास ताब्यात घेऊन अटक केली. त्याने चोरीचा उद्देशाने दगड डोक्यात घालून खून केल्याची कबुली दिली.

पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, कराड पोलीस उपविभागिय अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील, रमेश गर्जे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील व पोलिसांनी ही कारवाई केली.

Back to top button