सातारा : पदवी अभ्यासक्रमांसाठी सुधारित ‘श्रेयांक’ आराखडा;यूजीसीकडून अभ्यासक्रम जाहीर | पुढारी

सातारा : पदवी अभ्यासक्रमांसाठी सुधारित 'श्रेयांक' आराखडा;यूजीसीकडून अभ्यासक्रम जाहीर

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा पहिला टप्पा येत्या शैक्षणिक वर्षात राबवला जाणार आहे. त्यानुसार तीन वर्षांऐवजी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. त्यासाठी यूजीसीकडून सुधारित श्रेयांक आराखडा व अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला आहे. पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी मल्टीपल एंट्री व एक्झीटची सोय असली तरी पदवीसाठी सात वर्षांची मुदत मर्यादित करण्यात आली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये जाहीर केले तरी त्याची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून केली जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नवीन नियमावली व सुधारित श्रेयांक आराखडा नुकताच यूजीसी म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाने तयार केला असून नुकताच तो जाहीर केला आहे. सध्याच्या श्रेयांकावर आधारीत निवड पद्धतीमध्ये बदल करूनच ही रचना करण्यात आली आहे. या नवीन आराखड्याच्या अंमल बजावणीबाबतच्या सूचना उच्चशिक्षण संस्थांना देण्यात आल्या आहेत. नवीन आरखड्यानुसार चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात बहुविद्याशाखांतून विषयाची निवड करता येणार आहे. एकाच वेळी एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे. तसेच विद्यार्थी ऑनर्स व ऑनर्स संशोधन अशा दोन प्रकारामध्ये ऑनर्स पदवी घेऊ शकतात. मात्र, चार वर्षांचा तसेच १६० श्रेयांकांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावरच ऑनर्स पदवी मिळणार आहे. ७५ टक्के गुण व श्रेयांक तीन वर्षात मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला चौथ्या वर्षासाठी संशोधन शाखा निवडता येणार आहे. हा संशोधन प्रकल्प व प्रबंध हा प्रमुख विद्याशाखेतीलच असणार आहे. त्यासाठी १६० श्रेयांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला या संशोधन व प्रबंधासाठी १२ श्रेयांकांसह ऑनर्स पदवी दिली जाणार आहे.

नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत रोजगाराभिमुख शिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी पदवीपूर्व अभ्यासक्रमात मल्टीपल एंट्री व
एक्झिटची सुविधा दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांने तीन वर्षांच्या आधी अभ्यासक्रम सोडल्यास पुढील तीन वर्षात त्याला पुन्हा प्रवेश घेता येणार आहे. मात्र, पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी सात वर्षांची कालमर्यादा ठेवण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच व्यवसायिक अभ्यासक्रम शिकून रोजगार मिळवण्याची संधी मिळणार आहे. नवीन श्रेयांक आराखड्यानुसार मेजर श्रेणीतील अभ्यासक्रम डबल मेजर श्रेयांक वितरण, आंतरविद्याशाखीय व बहुविद्याशाखील अभ्यासक्रम याबाबतचे सर्व निर्णय विद्यापीठ व महाविद्यालयातील विद्या परिषद, अभ्यास मंडळाकडे राहणार आहेत.

अशी आहे श्रेयांक रचना..

पहिल्या वर्षात ४६ श्रेयांक मिळवून अभ्यासक्रम सोडून बाहेर पडल्यास उन्हाळ्याच्या सुट्टीत चार श्रेयांकाचा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच दोन वर्षात ८० श्रेयांक पूर्ण करुन उन्हाळ्याच्या सुट्टीत चार श्रेयांकाचा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यास पदविका प्रमाणपत्र मिळणार आहे. विद्यार्थी बहुशाखीय अभ्यासक्रम शिकत असल्याने प्रमुख विषयांमध्ये श्रेयांक देण्यात येणार आहेत. चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात १६० श्रेयांक मिळाल्यास ऑनर्स ही पदवी दिली जाणार आहे.

Back to top button