सातारा : कोयना धरणाचे दरवाजे दोन फुटांवर

कराड; पुढारी वृत्तसेवा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे धरणात प्रतिसेकंद 26 हजार 810 क्युसेक पाण्याची आवक होऊ लागल्याने धरणाचे सहा वक्री दरवाजे दोन फूट उचलून कोयना नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातून कोयना नदीत प्रतिसेकंद 20 हजार 200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून धरणातून सोडले जाणारे पाणी करण्यात आल्याने कोयना नदीसह कृष्णा नदीच्या पाणी पातळीत आता घट होणार आहे.

105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणार्‍या कोयना धरणातील पाणीसाठा 104.92 टीएमसीपर्यंत पोहचला होता. पावसाचा जोरही कायम होता. त्यामुळे कोयना धरणाचे दरवाजे पावणे पाच फुटापर्यंत उचलण्यात आले होते. त्यामुळेच धरणातून जवळपास 50 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.

मात्र पावसाचा जोर ओसरल्याने आता धरणात येणार्‍या पाण्याची आवक घटली आहे. धरणातील पाणीसाठाही 103.51 टीएमसीपर्यंत कमी झाला आहे. त्यामुळेच धरणाचे सहा वक्री दरवाजे दोन फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत. सध्या धरणाच्या सहा वक्री दरवाजातून प्रतिसेकंद 18 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर पायथा वीजगृहातील दोन जनित्रांद्वारे वीज निर्मिती करून 2 हजार 100 क्युसेक्स असा एकूण प्रतिसेकंद 20 हजार 200 क्युसेक पाणी कोयना नदी पात्रात सुरू आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता केवळ 1.74 टीएमसी इतकेच पाणी सामावून घेतले जाऊ जाऊ शकते.

सध्यस्थितीत धरणातील उपयुक्त पाणीसाठा 98.51 टीएमसी इतका आहे. तर धरणातील पाणी उंची 2162.2 फूट, जलपातळी 659.028 मीटर इतकी झाली आहे. एक जूनपासून बुधवार सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना येथे 4 हजार 189 मिलिमीटर पाऊस झाला आहे. नवजा येथे 5 हजार 492 मिलिमीटर तर महाबळेश्वरमध्ये 5 हजार 559 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचलत का :

गणपतीच्या ३०० पेक्षाही जास्त दुर्मिळ मूर्तींचा संग्रह

Back to top button