कोंबड्या चोरी करताना पाहिले म्हणून खून करणारे पाच दिवसांत गजाआड | पुढारी

कोंबड्या चोरी करताना पाहिले म्हणून खून करणारे पाच दिवसांत गजाआड

पैठण : पुढारी वृत्तसेवा

पैठण तालुक्यातील ढोरकीन येथील एका शेतात कोंबड्या चोरी करताना सालगड्यांनी आरोपीला पाहिले होते. हे सालगडी पोलिसांना सांगतील आणि पोलीस आपल्याला पकडतील या भीतीने आरोपींनी शनिवारी ( दि ११ ) पहाटे एका तरुणाचा खून केला होता. या खून प्रकरणातील पैठण एमआयडीसी पोलिसांनी पाच दिवसांत दोन आरोपींना पकडण्यात यश मिळविले आहे.

अधिक माहिती अशी की, ढोरकीन शिवारातील रामा परेकर यांच्या शेतवस्तीवर शनिवारी रोजी अज्ञात व्यक्तीने कोंबड्या व बकऱ्याची चोरी करून या ठिकाणी सालगडी असलेले संदीप सूर्यभान साळवे (वय २५, रा. आंबेडकरनगर, औरंगाबाद ह. मु ढोरकिन) या तरुणाच्या डोक्यात दगड घालून व प्राणघातक शास्त्राने खून झाल्याची घटना उघडकीस आली होती.

उपविभागीय पोलिस अधिकारी गोरख भामरे यांनी घटनास्थळी जाऊन पोलीस पंचनामा केला. त्यानंतर तपासासंदर्भात ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस व भागवत नागरगोजे यांना सूचना दिल्या. तपासासाठी दोन पथके तयार करण्यात आली.

कोंबड्या चोरी करणाऱ्या आरोपींमधील फूट आली कामी

पोलिसांचा तपास चालू असतानाच टाकळी ढोरकीन गायरान शिवारातील राहणाऱ्या पारधी समाजातील वस्तीवर किरकोळ चोरीसाठी तरुणाचा खून करायला नको होता अशी चर्चा सुरु झाली. यावरुन परिसरातील घटनेत सहभागी असलेले आरोपींचे दोन गट पडले. या चर्चेची माहिती पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली.

याच बातमीदाराने खून प्रकरणातील आरोपी या परिसरात लपून बसल्याची माहिती दिली. त्यानंतर मंगळवारी रात्री पोलीस पथकाने सदरील परिसर सापळा लावून आरोपी संजय मंजाराम चव्हाण (वय २६), मुकेश ऊर्फ बाळू पुंजाराम चव्हाण (वय २२) दोघेही रा. टाकळी गायरान शिवार यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठलाग करून अटक केली. सदरील घटनेमध्ये अन्य दोन आरोपींचा सहभाग असून या आरोपींचा शोध पोलिस घेत आहे.

या आरोपी तरुणांनी कबुली जबाब देत खून केल्याचे मान्य केले. त्यांनी १३ कोंबड्या आणि २ बकऱ्या चोरी करीत असताना तरुणाने पाहिले, आता पोलीस मागे लागणार म्हणून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने हा खून केल्याची कबुली दिली आहे.

दरम्यान, बुधवारी दोन्ही आरोपींना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अवघ्या पाच दिवसांमध्ये ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील व उपविभागीय पोलिस अधिकारी गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भागवत नागरगोजे, गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस उपनिरीक्षक चौरे, राहुल भदरगे, पो.ना आर. एस चव्हाण, राम मारकळ, दिनेश दाभाडे, राहुल बचके यांनी ही कामगिरी केली आहे.

Back to top button