सातारा : कोयना धरणाचे वक्री दरवाजे 5 फूट 3 इंचावर | पुढारी

सातारा : कोयना धरणाचे वक्री दरवाजे 5 फूट 3 इंचावर

कराड : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणात प्रतिसेंकद 57 हजार 808 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणाचे सहा वक्री दरवाजे 5 फूट 3 इंच इतके उचलण्यात आले आहेत. दरम्यान, सोमवारी सायंकाळी सात वाजता धरणातील पाणीसाठा 104.92 टीएमसी इतका झाला आहे.

कोयना धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी इतकी आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ 0.33 टीएमसी पाण्याची गरज आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वरसह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणाचे सहा वक्री दरवाजे सोमवारी सायंकाळी पाच वाजता चार फूट तीन इंच इतके उचलण्यात आले होते.

मात्र त्यानंतर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक काही प्रमाणात वाढली होती. सायंकाळी सात वाजता कोयना धरणातून प्रतिसेकंद 57 हजार 808 क्‍युसेक पाण्याची आवक होत होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या तुलनेत सायंकाळी सात वाजेपर्यंत धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली होती. म्हणून कोयना धरणाचे दरवाजे आणखी एक फुटाने उचलून ते पाच फूट तीन इंचावर नेण्यात आले आहेत.

पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणाचे दरवाजे आणखी उचलावे लागणार असल्याचे संकेत धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आले आहेत.

धरणातून प्रतिसेकंद 49 हजार 927 क्युसेक पाणी कोयना नदीत सोडले जात आहे. त्यामुळेच कोयना नदीसह कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असून नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचले का? 

Back to top button