विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या नातवाला मिठी मारल्याने आजीचाही दुर्दैवी अंत | पुढारी

विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या नातवाला मिठी मारल्याने आजीचाही दुर्दैवी अंत

गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा

मत्स्यव्यवसायासाठी खोदलेल्या खड्ड्याच्या सभोवताली असलेल्या जिवंत विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने आजी, नातू आणि एका ११ वर्षाच्या मुलाचा विजेच्या धक्याने मृत्यू झाला. ही घटना (दि.१४) चामोर्शी तालुक्यातील राममोहनपूर येथे घडली. राजू रामकृष्ण बिश्वास(१८), वीरकुमार सुभाष मंडल (११) व कमलाबाई बिश्वास (६५) अशी मृतांची नावे आहेत.

राममोहनपूर येथील रामकृष्ण विश्वास याने आपल्या शेतात मत्स्यव्यवसायासाठी खड्डा तयार केला आहे. माशांची चोरी होऊ नये यासाठी त्याने खड्ड्यासभोवताल तारेचे कुंपन करुन विद्युत प्रवाह सोडला होता. परंतु ही बाब त्याच्या मुलाला ठाऊक नव्हती.

मंगळवारी (दि. १४) सकाळी ११ वाजताच्या सुमारास रामकृष्ण बिश्वासचा मुलगा राजू बिश्वास व वीरकुमार सुभाष मंडल हे दोघे शेतावर गेले होते. त्यावेळी विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोघांचाही विजेच्या धक्याने मृत्यू झाला.

दरम्यान, संध्याकाळ होऊनही दोघेही घरी परत न आल्याने राजूची आजी कमलाबाई बिश्वास आणि वीरकुमारची आई शेतावर गेल्या. यावेळी दोन्ही मुले गतप्राण झाल्याचे दिसले.

यावेळी नातवाचा मृत्यू बघून कमलाबाई बिश्वासला राहवले नाही. तिने नातू राजू बिश्वासला कवटाळले. मात्र, तिचाही मृत्यू झाला. त्यानंतर वीरकुमारच्या आईने गावात येऊन घटनेची माहिती सांगितली.

पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड व उपनिरीक्षक गणेश जगले, सहायक फौजदार संजय गोंगले, चंद्रप्रकाश निमसरकार, राजू पचपुल्लीवार, ज्ञानेश्वर मस्के, अविनाश कासेट्टीवार, शिपाई रमा सदाशिव यांनी पंचनामा केला. याप्रकरणी रामकृष्ण बिश्वास याच्यावर कलम ३०४ भा.द.वि.सह कलम १३५ विद्युत कायद्यांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हेही वाचले का?

Back to top button