सातारा : भंगार दुकानात गांजा झाडाची लागवड; 5 लाखांचा माल जप्त | पुढारी

सातारा : भंगार दुकानात गांजा झाडाची लागवड; 5 लाखांचा माल जप्त

सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरालगत वाढे फाटा येथे जयदुर्गा स्क्रॅप मर्चंट या भंगार दुकानात गांजा झाडाची लागवड केल्याचे समोर आल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (एलसीबी) कारवाई करून एकाला अटक केली. पोलिसांनी या कारवाईत 5 लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. परशुराम रामफेर ठाकूर (वय 35, रा. रघुनाथपुरा पेठ, सातारा) असे संशयिताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, वाढे फाटा लगत गांजा झाडाची लागवड झाल्याची माहिती एलसीबीला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पथक तयार करुन छापा टाकला असता घटनास्थळी दुकानात गांजाची 4 मोठी झाडे आढळली. पोलिसांनी त्याचा पंचनामा केला असता ती सुमारे 21 किलोची होती. बाजारभावा प्रमाणे त्याची किंमत 5 लाख 22 हजार रुपये असल्याचे समोर आले.

या घटनेची माहिती परिसरात पसरल्यानंतर बघ्यांची गर्दी झाली. दरम्यान, पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर संशयिताची माहिती मिळाली व त्यानुसार त्याला ताब्यात घेवून शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. संशयितावर एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार सातारा शहर पोलिसात गुन्हा दाखल करुन मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नेमके झाड कोणी लावले? यामध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का? असे सवाल उपस्थित झाले असून सातारा शहर पोलिसांच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोर्‍हाडे, पोनि अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश गर्जे, फौजदार अमित पाटील, पोलिस अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, प्रवीण फडतरे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, गणेश कापरे, विशाल पवार, रोहित निकम, वैभव सावंत, राजू कुंभार, अमोल जाधवयांनी कारवाईत सहभाग घेतला.

अवैध धंद्यांचा पर्दाफाश पण कायमस्वरुपी होण्याची गरज

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात सर्व ठिकाणी पोलिसांच्या रेड पडत आहेत. जुगार, मटका, दारु विक्री या बरोबरच गांजाही पकडण्यात आला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी कारवाई पाहिली तर सातार्‍यात सर्वाधिक कारवाई झाल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. यामुळे अवैध धंद्याचा पर्दाफाश होत आहे. एसपी समीर शेख यांनी कार्यभार घेतल्यानंतर ही पोलखोल होत असून ही मोहिम कायमस्वरुपी राबवली जावावी, अशी मागणी होत आहे.

Back to top button