सातारा : अवजड वाहनांमुळे रस्ता बनला धोकादायक | पुढारी

सातारा : अवजड वाहनांमुळे रस्ता बनला धोकादायक

उंडाळे; वैभव पाटील :  कराडहून येवती व रयत सहकारी साखर कारखान्याकडे जाणारा रस्ता शेवाळेवाडी म्हासोली हायस्कूलच्या समोर पूर्णतः उखडला आहे. ऊस वाहतुकीमुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरून सर्वसामान्य माणसासह दुचाकी, तीन चाकी रिक्षा व अन्य चार चाकी लहान वाहनांना मोकळे जाता येत नसल्याने हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालून दुरुस्त करावा; अन्यथा या ठिकाणी मोठा अपघात होऊन लोकांचे जीव जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

उंडाळे येथून येवती सह रयत सहकारी साखर कारखान्याकडे जाणारा हा रस्ता माजी मंत्री स्व. विलासराव पाटील यांनी त्यांच्या प्रयत्नातून मंजूर करून या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. हा रस्ता करताना रस्त्यावरील जागोजागी असणारे चढ- उतार काढून तो रस्ता चांगला बनवण्याचा प्रयत्न केला. परंतु शेवाळेवाडी — म्हासोली गावच्या हद्दीत शेवाळेवाडी हायस्कूल ते सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पर्यंत 300 ते 400 मीटरचा हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने उखडत आहे. या रस्त्यावरून रयत सहकारी साखर कारखान्याकडे जाणारी ऊसाची अवजड वाहने याच मार्गावरून जातात त्यातच येथे मोठा चढ आहे. त्यामुळे या चढाला ऊसाची वाहने लोड असल्याने अडखळतात. त्यातच या रस्त्यावरून अवजड वाहने जाताना दुसर्‍या वाहनांची मदत जोड,(टोचन) घेऊन मदत घ्यावी लागते. त्यातच काही वाहने टोचन न घेताच स्वतःच्या ताकदीवर हा चढ सर करण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी या वाहनाची चाके जागेवर फिरवून तो रस्ता उखडला जातो व खराब होऊन खड्डे पडतात.

तिनशे ते चारशे मीटरचा हा रस्ता पूर्णतः उखडून त्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे पडलेले खड्डे मुजवण्यासाठी त्यात मोठी खडी टाकून ते खड्डे मुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु सदर खडी ही मोकळीच टाकल्यामुळे ही खडी उडून जेथून चाक जाते तेथे रस्त्यावर दोन्ही बाजूंनी चर पडली आहे. व या चरीतूनच ट्रॅक्टरची मोठी चाके जातात. पण या चरीमुळे अन्य वाहने मात्र जाऊ शकत नसल्याने अन्य वाहनधारकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यातच चरी मुळे तीन चाकी, चार चाकी लहान वाहने यांना जाताच येत नाही त्यातच चार चाकी वाहनांचे इंजिन व खालचा संपूर्ण भाग या दगडाना अडकून त्या वाहनांचे मोठे नुकसान होत आहे.

सध्या दुचाकीवरून जाताना येथून फक्त एकच दुचाकी व्यक्ती या रस्त्यावरून पुढे जाऊ शकतो तर अन्य रिक्षा किंवा चार चाकी वाहने ही नाल्याच्या बाजूने गटरीतून नेण्याचा प्रयत्न करावा लागतो. शिवाय बाजूने नेताना अनेकदा या वाहनांचे पलटी होऊन मोठे नुकसान झाले आहे. त्यातच दुचाकीवरून एकच व्यक्ती जात असताना ही व्यक्ती ही कसरत करत जात असताना त्याच चरीच्या खड्ड्यात पडून दुचाकी वाले जायबंदी जखमी झाली आहेत. त्यातच लहान चार चाकी गाड्यांना चांगल्या रस्त्यावरून जातानाही अडचण निर्माण होते मग अशा खडबडीत आणि उंचवटच्या रस्त्यावरून हे वाहन चालवणे म्हणजे दिव्य बनले आहे.

रस्ता दुरूस्तीसाठी ऊस वाहतूक रोखली; पण पुन्हा येरे माझ्या…

खराब रस्त्यामुळे दोन दिवसांपूर्वी या विभागातील ग्रामस्थांनी येथील उस वाहतूक रोखली होती. तदनंतर मोठे दगड गोटे टाकून हा रस्ता सुरू केला. पण चार दोन ट्रॅक्टर याच रस्त्यावरून गेले नी पुन्हा या रस्त्याची स्थिती पहिल्याप्रमाणे खड्डे व उंचवट्याची बनली आहे. त्यामुळे आणखी धोका निर्माण झाला आहे.
याबाबत ‘बांधकाम’ने तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे; अन्यथा या रस्त्यावर एखादा मोठा अपघात होऊ शकतो व तो झाल्यास त्याची जबाबदारी या विभागावर येऊ शकते. यासाठी प्रशासनाने येथील रस्ता वाहतुकीच्या प्रमाणात किती चांगल्या पद्धतीने बनवता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे; अन्यथा दररोज रस्ता करणे आणि तो उखडणे एवढेच काम यापुढील काळात राहणार आहे. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

विद्यार्थ्यांसाठीही धोकादायक रस्ता

शेवाळवाडी — म्हासोली येथे ऊस वाहतुकीसाठी एका बाजूने व अन्य नियमित वाहतूक एका बाजूने जाण्याची व्यवस्था केली तर काही प्रमाणात हा प्रश्न सुटू शकतो. कारण सध्या ऊस वाहतूक व अन्य सर्व वाहतूक याच रस्त्याने चालते. याशिवाय येथे शाळा ही असल्याने विद्यार्थ्यांनाही रस्ता उपयुक्त ठरेल. सध्या विद्यार्थ्यांना जाताना याच धोकादायक रस्त्याच्या बाजूने जावे लागते.

Back to top button