सातारा : इथेनॉल उत्पादन 3 कोटी लिटरने वाढणार | पुढारी

सातारा : इथेनॉल उत्पादन 3 कोटी लिटरने वाढणार

सातारा;  महेंद्र खंदारे : इथेनॉल निर्मितीसाठी केंद्र सरकारने घेतलेली अनुकूल भूमिका आणि कारखान्यांनी दिलेला प्रतिसाद यामुळे राज्यासह सातारा जिल्ह्यात यंदाही इथेनॉल निर्मिती मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यातील इथेनॉल उत्पादनात सुमारे अडीच कोटी लिटरची वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यात 190 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम पूर्ण केला. सध्याच्या घडीला राज्यातील 65 कारखान्यांकडे इथेनॉलचे प्रकल्प आहे. राज्यामध्ये यंदाच्या हंगामात 65 कोटी 51 लाख 12 हजार लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा, सह्याद्री, गोपूज, कृष्णा, जरंडेश्वर, जयवंत शुगर, शरयू, दत्त इंडिया, स्वराज या कारखान्यांनी इथेनॉलची निर्मिती केली आहे. या कारखान्यांनी 11 कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती गत हंगामात केली. प्रामुख्याने सी हेवी, बी हेवी व थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यात आली आहे.

2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. त्यादृष्टीने केंद्राकडून साखर कारखान्यांना डिस्टलरी प्रकल्प उभारणे व विस्तारण्यासाठी अनुदान दिले जात आहे. याचा फायदा सातारा जिल्ह्यातील कारखान्यांनी घेतला आहे. यंदा प्रथमच कारखान्यांनी आपले साखर उत्पादन कमी करत इथेनॉल निर्मितीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिल्यानंतर साखर कारखान्यांना एक प्रकारे उर्जितावस्था येवू लागली आहे. याचा प्रत्यय या हंगामात आला
आहे. इथेनॉलचे चांगले उत्पन्न मिळत असल्याने कारखानदारांनीही चांगला प्रतिसाद देण्यास सुरूवात केली आहे.

यंदा अजिंक्यतारा, सह्याद्री आणि कृष्णा कारखान्याने इथेनॉल निर्मिती प्रकल्पाची विस्तारवाढ केली आहे. त्याचबरोबर गेली अनेक वर्षे बंद असलेला किसनवीरचाही प्रकल्प सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील इथेनॉल निर्मितीमध्ये वाढ होण्याची चिन्हे आहेत.
या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी केंद्र सरकार आणि देशातील साखर कारखानदारांची ऑनलाईन व्हीसी झाली. यामध्ये इथेनॉल निर्मिती कशी वाढेल यावर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये केंद्र सरकारच्यावतीने इथेनॉल प्रकल्प, विस्तारवाढ, इथेनॉल विक्री या सर्व बाबींमध्ये मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. कारखानदारांचे सर्व प्रश्न सरकार सोडवेल मात्र कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीची क्षमता वाढवावी, असा आग्रह सरकारकडून करण्यात आला आहे.

इथेनॉल निर्मितीला पूरक अशी भूमिका कारखानदारांनी घेतली आहे. त्यामुळे प्रामुख्याने पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, नाशिक या जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी आपली क्षमता वाढवली आहे. त्याचा फायदा इथेनॉल उत्पादन वाढीसाठी होणार आहे.

 

कारखाना                      इथेनॉल उत्पादन (लिटर्स)

दत्त इंडिया                                2 कोटी 44 लाख 80 हजार
जरंडेश्वर                                    2 कोटी 35 लाख 9 हजार
शरयू                                         2 कोटी 15 लाख 96 हजार
स्वराज                                       1 कोटी 28 लाख 10 हजार
जयवंत शुगर                              1 कोटी 11 लाख 17 हजार
कृष्णा                                          90 लाख 41 हजार
अजिंक्यतारा                                         45 लाख
सह्याद्री                                                15 लाख
गोपूज                                          12 लाख 55 हजार
एकूण                                       10 कोटी 98 लाख 8 हजार

Back to top button