पुणे : पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासन अॅक्शन मोडवर आले असून, महापालिका आयुक्तांनी सर्व वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेऊन शहरातील अनधिकृत व धोकादायक होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील आठवडाभरात पाहणी करून पंधरा दिवसांत असे होर्डिंग हटवा; अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्याची तंबीही आयुक्तांनी दिली आहे. महापालिका हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात जाहिरात होर्डिंग आहेत. यामध्ये 2598 अधिकृत होर्डिंग आहेत, ज्यामध्ये होर्डिंग उभारण्याच्या नियमाला तिलांजली देऊन परवानगी दिलेल्यांचा समावेश आहे.
याशिवाय 85 अनधिकृत होर्डिंग असून, 1564 अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पुण्यातील मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकात आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रावेत येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा प्राण गेल्यानंतर महापालिकेने शहरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना शहरातील अधिकृत होर्डिंगमालकांना केल्या होत्या. तसेच अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त करण्याची मोहीम हाती घेतली होती. मात्र, काही दिवसांनंतर सर्व कारवाई गुंडाळण्यात आली.
आत्तापर्यंत 2249 होर्डिंगचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल महापालिकेला सादर केला असून, 359 होर्डिंगचे अहवाल अद्यापही आले नाहीत. दरम्यान, मुंबईतील घाटकोपर येथे मंगळवारी भलेमोठे होर्डींग कोसळले. या दुर्घटनेनंतर पुणे महापालिका ऑक्शन मोडवर आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी बुधवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त आणि विभागप्रमुखांची बैठक घेतली.
यामध्ये त्यांनी शहरातील रस्त्याच्या कडेला, पदपथला लागून, दुकानांवर, इमारतींवर असलेल्या होर्डिंगची आठवडाभरात पाहणी करा, होर्डिंग उभारण्यासंदर्भात शासनाने निश्चित केलेल्या नियमांचे उल्लंघन करणार्या होर्डिंगवर कारवाई करा, स्ट्रक्टर ऑडिट अहवाल आलेल्या होर्डिंगची शहानिशा करा, त्यांचे स्ट्रक्चर योग्य आहे का, याची खातरजमा करा, तसे न आढळल्यास तातडीने कारवाई करा, तसेच धोकादायक व अनधिकृत होर्डिंग उभारण्यात आलेल्या होर्डिंगमालकासह जागा व इमारतमालकावरही कारवाई करा, असे आदेश आयुक्तांनी दिले.
तुमच्या परिसरात दोन किंवा त्यापेक्षा अधिक होर्डिंग्ज एकत्र करून मोठे होर्डिंग तयार केले असल्यास, रस्त्याच्या कडेला असलेल्या इमारतींच्या भिंतींना धोकादायक पद्धतीने परवाना असलेल्या होर्डिंग्ज लटकत असल्यास, चौकाजवळ होर्डिंग उभे असल्यास, यांसारख्या विविध नियमांचे उल्लंघन करून होर्डिंग उभे असल्यास, त्याचा फोटो आणि ठिकाण दैनिक 'पुढारी' कार्यालयास (मोबाईल नं. 9665077174) पाठवा, आम्ही त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करू.
मी स्वतः जंगली महाराज मंदिर ते टिळक (अलका) चौक यादरम्यान असणार्या होर्डिंग्जची पाहणी केली. अनेक होर्डिंग धोकादायक पद्धतीने उभारण्यात आल्याचे निदर्शनास आले. ज्या होर्डिंगचा स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल महापालिकेला मिळाला आहे, त्या होर्डिंगचे स्ट्रक्चर खरोखर भक्कम आहे का, याची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसे नसेल तर होर्डिंगमालक व जागा किंवा इमारतमालकावर कारवाई करण्यात येईल. तसेच अनधिकृत सर्व होर्डिंग आठ दिवसांत पाडण्याचे आदेश दिले आहेत. अशा होर्डिंगवर कारवाई न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
– डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त महापालिका
हेही वाचा