दिड महिन्यानंतर आंबेनळी घाट रस्त्यावरील वाहतूक अखेर सुरु | पुढारी

दिड महिन्यानंतर आंबेनळी घाट रस्त्यावरील वाहतूक अखेर सुरु

महाबळेश्वर; प्रेषित गांधी : महाबळेश्वर तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबेनळी घाट रस्त्याची मोठी दुर्दशा झाल्याने किल्ले प्रतापगड परिसरातील २२ गावांचा संपर्क तुटला. त्यामुळे हा घाट रस्ता कोकण विभागाला देखील जोडत असल्याने या भागातील नागरिकांची दळणवळणाची मोठी समस्या निर्माण झाली होती.

आज या घाटरस्त्यावरील वाहतूक सुरु करण्यात आली आहे. मात्र, ट्रक- एसटी बससारख्या अवजड वाहनांना तूर्तास तरी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

गत जुलै महिन्याच्या अखेरीस कोसळलेल्या धुँवाधार पावसाने महाबळेश्वर तालुक्यात मोठे नुकसान झाले होते. या आस्मानी संकटात तालुक्यातील अनेक गावांना जोडणाऱ्या पुलाचे मुख्य रस्त्यांचे नुकसान झाले. यामध्ये प्रामुख्याने आंबेनळी घाट रस्त्याची मोठी दुर्दशा झाली.

या घाटरस्त्यावर तीसहून अधिक ठिकाणी छोट्या- मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळल्या. काही ठिकाणी रस्त्याला तडे गेले होते. तर मेटतळे गावापासून अंदाजे एक ते दोन किमी अंतरावर मुख्य रस्ता तीस फूट खचल्याने वाहतूक पूर्णतः बंद झाली होती. यामुळे किल्ले प्रतापगड परिसरातील २२ गावांचा संपर्क तुटला.

तसेच हा घाट रस्ता कोकण विभागाला देखील जोडत असल्याने या भागातील नागिरकांची दळणवळणाची मोठी समस्या निर्माण झाली होती. या भागातील लोकांना जंगलमार्गातून अनेक किमीची पायपीट करून महाबळेश्वर या तालुक्याच्या ठिकाणी यावे लागत होते. त्यामुळे या भागातील लोकांचे मोठे हाल होत होते.

दिड महिन्यापासून या घाट रस्त्यावर ठिकठिकाणी दरडी कोसळल्याने आलेली माती, मोठमोठे दगड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते. प्रामुख्याने तीस फूट खचलेला हा रस्ता पुन्हा नव्याने तयार करण्याचे आव्हान बांधकाम विभागावर होते. रस्ता मोठ्या प्रमाणावर खचल्याने या झालेल्या ठिकाणी गॅबेन टेकनॉलॉजीचा वापर करण्यात आला.

अंदाजे तीस फूट खोल भराव टाकून त्यानंतर रस्त्यावर जाळीचे बेड तयार करून बेडमध्ये दगड भरून खचलेला रस्ता जोडण्याचे काम सुरु होते. गत दिड महिन्यापासून कर्मचारी धोकादायक ठिकाणी काम करत होते. आज अखेर दिड महिन्यांच्या प्रतेक्षेनंतर या घाटरस्त्याचे काम पूर्णत्वास गेले असून वाहतूक आज सुरु करण्यात आली.

सुरक्षिततेच्या दृष्टीने बांधकाम विभागाच्यावतीने फलक देखील लावण्यात आले असून दुचाकी व चारचाकी वाहने प्रतापगडसह कोकणाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या विभागातील नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न मिटला आहे. या दरम्यान एसटी बस, ट्रकसारख्या अवजड वाहनांना मात्र अजूनही काही दिवस प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

सोमवारी या घाटरस्त्याची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता महेश गोंजारी दिनेश पवार यांनी केली.

आंबेनळी घाटरस्त्याच्या काम चांगल्या पद्धतीने व लवकरात- लवकर होऊन या भागातील जनतेला दिलासा देण्याबाबतचा पाठपुरावा आ. मकरंद पाटील यांनी केला.

हेही वाचलंत का? 

Back to top button