मीरारोड येथील नरेंद्र पार्क मध्ये आईसह दोन गतिमंद मुलांची आत्महत्या | पुढारी

मीरारोड येथील नरेंद्र पार्क मध्ये आईसह दोन गतिमंद मुलांची आत्महत्या

भाईंदर; पुढारी वृत्तसेवा : मीरारोडच्या नयानगर परिसरातील नरेंद्र पार्क गृहसंकुलात आपल्या दोन गतिमंद मुलांसह महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आईने आपल्या दोन गतिमंद मुलांना झोपेच्या गोळ्या दिल्यानंतर स्वतःही त्या गोळ्या घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

नरेंद्र पार्क मधील जुही इमारतीत राहणाऱ्या नसरीन वाघू (४३) यांचा पतीसोबत एक वर्षापूर्वी घटस्फोट झाला होता. त्यामुळे त्या आपला मुलगा मोहम्मद अर्ष वाघू (१२) व मुलगी सदफ नाझ वाघू (२०) यांच्यासह आपल्या वडिलांसोबत जुही इमारतीत राहत होत्या. नसरीन यांना मानसिक आजार असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. तर त्यांची दोन्ही मुले गतिमंद होती.

सोमवारी रात्री थंड पेयावरून आई व मुलांचा वाद झाला होता. यानंतर ते तिघेही रात्री ११ वाजता बेडरूम मध्ये झोपण्यास गेले.

सकाळी ६ वाजताच्या सुमारास नळाला पाणी आल्याने नसरीन यांचे वडील झोपेतून उठले.

त्यांनी नसरीन व मुले झोपलेल्या बेडरूमचा दरवाजा ठोठावला.

पण आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी ते गाढ झोपेत असल्याचे समजून ते पुन्हा झोपण्यास गेले.

सकाळी १० वाजता त्यांना पुन्हा जाग आल्यानंतर त्यांना नसरीन व मुले अद्याप झोपेतून उठली नसल्याचे दिसून आले.

त्यांनी आपल्याकडील चावीने बेडरूमचा दरवाजा उघडला असता त्यांना नसरीन व मुले मृतावस्थेत पडल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती इमारतीतील रहिवाशांना समजताच त्यांनी त्याची माहिती नयानगर पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतांचा पंचनामा केला असता त्यांना तेथे झोपेच्या गोळ्यांची बाटली दिसून आली.

तसेच त्यातील बहुतांशी गोळ्या वापरल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

यावरून सतत डिप्रेशनमध्ये असलेल्या नसरीन यांनी सुरुवातीला मुलांना झोपेच्या गोळ्या दिल्या.

त्यानंतर त्यांनी स्वतः झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वरीष्ठ पोलिस निरीक्षक वनकोटी यांनी वर्तविला आहे.

तिन्ही मृतदेह जे. जे. रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचलंत का :

खद खद मास्तर घडवताहेत हजारो अधिकारी । नितेश कराळे

Back to top button