रुग्णालयाच्या व्हरांड्यात झाली प्रसूती; नवजात अर्भक दगावले | पुढारी

रुग्णालयाच्या व्हरांड्यात झाली प्रसूती; नवजात अर्भक दगावले

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर रूग्णालयात पोहोचलेल्या गर्भवती महिलेला तब्बल दीड तास प्रतीक्षा करावी लागल्याने नवजात अर्भक दगावल्याची घटना येथे घडली . रूग्णालय प्रशासनाच्या वेळकाढू धोरणाने बाळ दगावल्याचा आरोप करीत रूग्णाच्या नातेवाईकांनी रूग्णालयातच गोंधळ घातला.

नागपुरातील डागा रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार मंगळवारी समोर आला. २७ वर्षीय महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या आतील भागात व्हरांड्यात झाली. यानंतर संबंधित महिलेचे बाळ दगावले.

रुग्णालयात पोहचून सुद्धा तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी महिलेला दाखल करुन घेतले नाही. त्यामुळे सुमारे दीड तास ती गरोदर महिला ताटकळत राहिली. यामुळेच बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला.

गरोदर महिलेला रुग्णालयांचे उंबरे लागले झिजवायला

वासनिक कुटुंब नागपूर जिल्ह्यातील वाडी परिसरात वास्तव्यास आहे. प्रसूतीपूर्वी राणी वासनिक या कन्हान या ठिकाणी आपल्या माहेरी गेलेल्या होत्या.

सोमवारी रात्री प्रसूती वेदना सुरू झाल्यामुळे स्थानिक कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.

यावेळी तिथे त्यांना दाखल न करून घेता कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

उपजिल्हा रुग्णालयातूनही त्यांना नागपूर शहरातील डागा रुग्णालयात हलवण्यात आले; पण डागा रुग्णालयात कर्मचाऱ्यांनी त्‍यांना त्वरित रुग्णालयात दाखल करुन घेणे अपेक्षित होते. मात्र कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले. यामुळे रुग्णालयाच्या व्हरांड्यातच राणी यांची प्रसुती झाली.

त्यानंतर कर्मचाऱ्यांनी धावपळ केली. पण वेळ निघून गेली होती नवजात अर्भक वाचू शकले नाही, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बाळ दगावले, असा आराेप वासनिक कुटुंबीयांनी केला. रुग्णालय प्रशासनाकडून यासंदर्भात सुरवातीला स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते. मात्र अखेरीस रूग्णालय प्रशासनाने आपली बाजू प्रसारमाध्यमांकडे मांडली.

बाळाच्या हृदयाचे ठोके सुरू नव्हते

संबंधित गर्भवती रात्री १२.२० वाजता डागा रूग्णालयात आली. लेबर रूमजवळ खालीच बसून तिचे बाळंतपण केले. बाळाचा जन्‍म झाला तेव्हाच त्याच्या हृदयाचे ठोके व श्वासोच्छश्वास सुरू नव्हते, अशी माहिती डागा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. सीमा पारवेकर यांनी दिली.

आमच्या बालरोगतज्ज्ञांनी बाळाला वाचविण्‍यासाठी सर्व प्रयत्‍न केले. रुग्णाच्या नातेवाईकांनी बाळंतपण करताना व्हिडीओ काढून व्हायरल करण्याचे धमकी दिली. हा शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रकार आहे, असे डॉ. सीमा पारवेकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचलं का?

Back to top button