सातारा : खटाव तालुक्यात पुन्हा जोरदार पाऊस | पुढारी

सातारा : खटाव तालुक्यात पुन्हा जोरदार पाऊस

खटाव;  पुढारी वृत्तसेवा :  खटाव तालुक्यात मंगळवारी पावसाने पुनरागमन केले. अतिवृष्टीने बेजार झालेल्या तालुक्याच्या उत्तर भागाला पावसाने चांगलेच झोडपले. ओढे, नदी, नाल्यांना पूर आला तर उरली सुरली पिकेही पाण्याखाली गेली.

गेले काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने मंगळवारी दुपारपासून पुन्हा बरसायला सुरुवात केली. खटाव उत्तर भागात दमदार पाऊस झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. या अगोदर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप झाले नसल्याने हा भाग नुकसान भरपाईपासून वंचित राहिला आहे. त्यातच आता पुन्हा पावसाने नुकसान झाले आहे. मंगळवारी पडलेल्या पावसाने उत्तर भागातील रस्त्यांना नदीचे स्वरुप आले होते. अनेक पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. खटाव, पुसेगाव, वडूजपर्यंत मंगळवारी पाऊस बरसला. येरळा नदीच्या पाणीपातळीत पावसामुळे आणखी वाढ झाली आहे.

मंगळवारच्या पावसाने तालुक्यात ओढे आणि येरळा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने तसेच पावसाचा जोर वाढत असल्याचे पाहून बहुतांश शाळा लवकर सोडण्यात आल्या. ओढ्यांना पाणी वाढल्याने काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी अडकून पडले होते.

Back to top button