सातारा : परतीच्या पावसाने खरीप वाया जाण्याची भीती | पुढारी

सातारा : परतीच्या पावसाने खरीप वाया जाण्याची भीती

वाई; पुढारी वृत्तसेवा :  गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने वाई तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाने खरीप वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून सोयाबीन, वाटाणा, घेवड्यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील पाणी निघत नसल्याने फिके कुजू लागली आहेत.
वाई तालुक्यात खरीप हंगामातील पिकांवर अतिवृष्टीचा विपरीत परिणाम झाला आहे. शेतातील पाणीच निघत नसल्याने अनेकांना त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागला आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतीतील पिके काढणीची कामे खोळंबली आहेत. पिके आणि त्यातील तण एकसारखीच वाढली आहेत. शेतातील कडधान्य काढणीस आली आहेत. मात्र पाऊस उघडीप देत नसल्याने घेवडा, वाटाणा, मूग, चवळी ही कडधान्ये पिके जागेवर कुजण्याच्या मार्गावर आहेत. इतर पिकांची वाढ ऊन मिळत नसल्याने खुंटली आहे. कीड व रोगराईला निमंत्रण मिळत आहे. जनावरांचा चारा वाया गेला असून चार्‍याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती बळीराजाला सतावू लागली आहे.
मुसळधार सुरू असलेल्या पावसामुळे अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी नव्याने बनवलेले रस्ते या पावसात वाहून गेल्याने वाहनधारकांना प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. गेली आठदिवस झाले दररोज संध्याकाळी ढगफुटीसारखा पाऊस कोसळत आहे. पावसामुळे खरीप हंगामातील कोरडवाहू जमिनीतील पिकांना थोडासा दिलासा मिळाला असला तरीही भात पिकाचे नुकसान झाले आहे. बळीराजाला डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली आहे. बियाण्यांसह खत, रोजंदारीसाठी हजारो रुपये खर्च झालेले पीक हातातून निघून जाते की काय? अशी अवस्था वाई तालुक्यात झाली आहे. त्यामुळे आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाई तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे. घेवडा, सोयाबीन, उडीद वाटाणा, ही पिके शेतातच कुजल्याने त्याचा उत्पन्नावर परिणाम झाला आहे. कृषी विभागाने त्वरित पंचनामे करून शेतकर्‍यांना जास्तीत-जास्त नुकसान भरपाई मिळावी, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. पावसामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांचे जीवनमानच बदलून गेले आहे. सध्या बाजारात भाजी-पाल्यांला चांगला भाव आहे, तर शेतात मालच नाही. विकायचं काय हा प्रश्न बागायती शेतकर्‍यांना पडला आहे. हळद-ऊस या पिकांवर सुद्धा अतिवृष्टीचा विपरीत परिणाम झाला असून, पिकांवर विविध प्रकारचे रोग पडले आहेत. एकंदरीत अस्मानी संकट कोसळल्याने पावसामुळे बाजारात मात्र स्मशान शांतता आहे.

Back to top button