सातारा : जिल्ह्यात ढगफुटीने हाहाकार | पुढारी

सातारा : जिल्ह्यात ढगफुटीने हाहाकार

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सातारा शहरासह जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशीही धुवाँधार पाऊस झाला. जावली तालुक्यातील काही गावांमध्ये तसेच सातारा तालुक्यातील कण्हेर परिसरात ढगफुटीसारखा पाऊस कोसळल्याने हाहाकार माजला. सातारा शहर, मेढा, कोंडवे व लिंब येथे घरांमध्ये व शेतीमध्ये पाणी घुसले. विविध ठिकाणी पुलांवरून पाणी वाहिल्याने वाहने अडकून पडली. या पावसामुळे ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. दरम्यान, या पावसामुळे शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने दाणादाण उडाली आहे.

मंगळवारी पावसाने झोडपल्यावर बुधवारी सकाळी कडक ऊन पडले होते. मात्र 11.30च्या सुमारास पावसाने सुरुवात केली. सातारा शहर व परिसरात दु.2 वा.पासून ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सलग दुसर्‍या दिवशी सातारा शहर व परिसरात धुवाँधार पाऊस सुरू झाला. सायंकाळी 5 नंतर मात्र पावसाचा जोर आणखी वाढल्याने अवघे जनजीवन विस्कळीत झालेे.

सातारा तालुक्यात सलग दुसर्‍या दिवशी झालेल्या पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले. नाले तुडूंब वाहून अनेक ठिकाणी नाल्यांमधील कचरा रस्त्यावर आला तर सखल भागात पाणी साचून राहिले. लिंब येेथे या पावसाने नुकसान झाले आहे. गावातील शेतांमध्ये व अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. गावातील मुख्य पूल पाण्याखाली गेला होता. मेढा येथील मुख्य चौकात पाण्याचे तळे झाल्याचे दिसून आले.
सातारा शहर व परिसरास सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपले. ढगफुटीसद‍ृश्य झालेल्या पावसाने गोळीबार मैदान, म्हाडा कॉलनी, राधिका रोड परिसरातील 8 ते 10 घरांमध्ये पाणी घुसले. नाले व ओढे तुंबल्याने गोळीबार मैदान परिसरातील प्रमुख रस्ता पाण्याखाली गेला. सातारा नगरपालिकेच्या आरोग्य व बांधकाम विभागाने ठिकठिकाणी कर्मचारी व जेसीबीच्या सहाय्याने मदत कार्य केले.
ओढ्याच्या बाजूला असलेल्या घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

बुधवार नाका परिसरातही पावसाने नुकसान केले. घरांमध्ये पाणी घुसल्याची माहिती मिळताच मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी आरोग्य विभाग तसेच बांधकाम विभागाला संबंधित ठिकाणी मदत कार्य करण्याचे आदेश दिले. नगर अभियंता दिलीप चिद्रे, आरोग्य विभाग प्रमुख प्रकाश राठोड यांनी संबंधित ठिकाणी जावून पाहणी केली. तुंबलेल्या ओढ्यांतील घाण जेसीबीच्या साहाय्याने मोकळे करण्यात आले. घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने काही प्रमाणात घरगुती साहित्याचे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.

महाप्रसादावर पावसाचे पाणी…

गणपती बाप्पाच्या विसर्जनला अवघे दोन दिवस उरल्याने अनेक सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये सत्यनारायण पूजा, होम हवन, महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे. बुधवारीही सातारा शहरातील अनेक मंडळांमध्ये सत्यनारायण पूजेसह होम, हवन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी लवकरच्या मुहूर्तावर पूजा, होमहवन निर्विघ्न पार पडले. मात्र, दुपारपासून सुरू झालेल्या महाप्रसादावर परतीच्या पावसाचे पाणी पडले. अनेक गणेशभक्‍तांना इच्छा असूनही महाप्रसादासाठी जाता आले नाही. जोरदार पावसामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.

Back to top button