सातारा : मेडिकल कॉलेज कामात ढवळाढवळ खपवून घेणार नाही : ना. शंभूराज देसाई | पुढारी

सातारा : मेडिकल कॉलेज कामात ढवळाढवळ खपवून घेणार नाही : ना. शंभूराज देसाई

सातारा;  पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम तसेच आरोग्य विभागाकडील रखडलेल्या कामांना गती देण्याचा प्रयत्न आहे. पाटबंधारे विभागाचे तीन प्रकल्प रखडवणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत घालण्याचे आदेश दिले आहेत. मेडिकल कॉलेज बांधकामाची निविदा निघाली आहे. या कामात बाहेरच्यांची ढवळाढवळ खपवून घेणार नाही, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची आढावा बैठक घेतल्यानंतर ना. शंभूराज देसाई म्हणाले, मेडिकल कॉलेजसाठी आवश्यक स्टाफसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याचा पाठपुरावा करणार आहे. टेंडर अंतिम करण्याची प्रक्रिया महिनाभरात होईल. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मेडिकल कॉलेज जागेचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. एमबीबीएसच्या दुसर्‍या वर्षाची बॅच दोन महिन्यांनी प्रवेशित होणार आहे.

मेडिकल कॉलेजबाबत विचारले असता ना. शंभूराज देसाई म्हणाले, मेडिकल कॉलेजच्या कामात बाहेरच्या कुठल्याही व्यक्‍तीची ढवळाढवळ चालू देणार नाही. जिल्ह्याच्यादृष्टीने विकासाच्या दृष्टीने मेडिकल कॉलेज महत्त्वाचे आहे. मुदतीपूर्वी काम होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांचे बारामतीपेक्षा सातार्‍याच्या मेडिकल कॉलेजवर अधिक प्रेम आहे, ही चांगली गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.

जलसंपदाचे प्रकल्प काही रखडले आहेत. धोम-बलकवडी आणि जिहे-कठापूर या प्रकल्पांना गती देण्याची आवश्यकता आहे. संबंधित अधिकार्‍यांना सुचना केल्या आहेत. भूसंपादनाचा आढावा जिल्हाधिकारी घेणार आहेत. तडजोडीतून जमीन भूसंपदानासाठी अधिक निधी लागल्यास उपलब्ध केला जाणार आहे. प्रधानमंत्री सिंचन योजनेत सर्व सहाही प्रकल्पांचा समावेश आहे. मुदतीत प्रकल्प पूर्ण करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. दोन-तीन प्रकल्प ठेकेदारांच्या दिरंगाईने रखडले.
कामास जाणीवपूर्वक उशीर करणार्‍या ठेकेदारांना ताबडतोब काळ्या यादीत घाला असे आदेश अधीक्षक अभियंत्यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

ना. शंभूराज देसाई म्हणाले, सैनिक स्कूलला पूर्वी निधी दिला आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांच्या काळात त्या कामाचा प्‍लॅन तयार करण्यात आला होता. त्याचे सादरीकरण संबंधित अधिकार्‍यांनी केले. काही किरकोळ बदल सुचवले असून लवकरच या कामाचे टेंडर निघेल. पाटण येथे उपजिल्हा रुग्णालय 100 खाटांचे रुग्णालय करण्यात येणार आहे. तसेच प्रशासकीय इमारतीही बांधण्यात येणार आहेत. या कामाची वर्क ऑर्डर झाली आहे.

ना. शंभूराज देसाई म्हणाले, शासन स्तरावर कामांचा पाठपुरावा होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित विभागांतील ज्येष्ठ अधिकार्‍यांची नियुक्‍ती मंत्रालयातील कामांचा पाठपुरावा करण्यासाठी करा, अशी सूचना बांधकाम, पाटबंधारे तसेच मेडिकल कॉलेज यांना केल्या आहेत.

सिव्हिल हॉस्पिटलमधील समस्यांसंदर्भात विचारले असता ना. शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना पाहणी करण्याची सूचना केली. रिक्‍त पदे भरण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कराड उपजिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन मशिनवर कोट्यवधी खर्च झाला पण ती वापरात आली नसल्याचे निदर्शनास आणून दिले असता ना. शंभूराज देसाई यांनी याप्रकरणी चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.
बुलढाण्यात सेना-शिंदे गटात झालेल्या वादाबाबत विचारले असता ना. शंभूराज देसाई म्हणाले, ‘अरे ला.. का रे’ अशी प्रतिक्रिया येणारच. सातार्‍यात शिंदे गटाला धक्‍का लावण्याचं धाडस कुणी करेल असं वाटत नाही. तसा प्रयत्न कुणी केला तर पुढंच पुढं, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी उपस्थित होते.

Back to top button