सातारा : उशिरा का होईना शहाणपण सुचले हे सातारकरांचे भाग्य : आ. शिवेंद्रराजे | पुढारी

सातारा : उशिरा का होईना शहाणपण सुचले हे सातारकरांचे भाग्य : आ. शिवेंद्रराजे

सातारा; पुढारी वृत्तसेवा : ज्या कास धरण प्रकल्पाची टिमकी वाजवताय ते कोणामुळे आणि कसे झाले? हे सर्व सातारकरांना माहिती आहे. सातारकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी बांधील असतो आणि तेच काम मी करतो. वास्तविक कास धरण प्रकल्पाचे काम सुरु झाल्यानंतर तातडीने वाढीव जलवाहिनी टाकण्याचे काम मंजूर करून घेणे आवश्यक होते. पण, केवळ पैसे खाण्यासाठी सत्ता मिळवणार्‍यांना याचे भान राहिले नसावे. उशिरा का होईना शहाणपण सुचले हे सातारकरांचे भाग्यच म्हणावे लागेल. पालिकेला लुटून खाणार्‍यांचे ‘ब्रीद’ काय आहे, हे सातारकर जाणून आहेत, असा खोचक टोला आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला असून काम मंजूर केल्याबद्दल मुख्याधिकारी अभिजित बापट यांचे आभार मानले आहेत. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आ. शिवेंद्रराजे यांनी खा. उदयनराजे यांचे नाव न घेता त्यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

जनतेने पाच वर्षांसाठी पालिकेची सत्ता दिली ती सातारा शहराचा विकास करण्यासाठी, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी. मात्र सत्ताधार्‍यांना नागरिकांशी काहीही देणेघेणे नाही, हे पालिकेत कमिशन, टेंडर आणि टक्केवारीसाठी लागणार्‍या कळवंडी पाहून सातारकरांना समजलेच आहे. आता निवडणूक जवळ आली की यांच्यातला ‘कैवारी’ नेहमीप्रमाणे झोपेतून जागा झाला आहे, हेही सातारकर ओळखून आहेत. डिसेंबर 2021 मध्येच सातारा पालिकेची बॉडी बरखास्त झाली आणि पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली. त्यामुळे दि. 24 जानेवारी 2022 रोजी प्रशासक असलेल्या मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केंद्राच्या अमृत अभियानातून कास ते सातारा अतिरिक्त पाईपलाईनसाठी प्रस्ताव पाठवला आणि निधी मंजूर झाला. त्यामुळे यासाठी मुख्याधिकारी अभिजित बापट यांचे आभार मानले पाहिजेत.

पालिकेत आता तुमची सत्ता नाही, प्रशासक आहे याचे तरी भान ठेवा. त्यामुळे ज्या पाईपलाईनच्या कामाची आता टिमकी वाजवताय हे काम तुमचे नाही, ते बापट यांच्यामुळे झाले आहे. खरे तर, कास धरण उंची वाढवण्याचे काम सुरु झाल्यानंतर अतिरिक्त पाईपलाईन टाकण्याचे काम मंजूर करून घेतले असते तर आज सातारकरांना कास धरणातील वाढीव आणि मुबलक पाणी मिळाले असते पण, तुमच्या नको त्या ‘कार्यबाहुल्यामुळे’ आणि नाकर्तेपणामुळे याचा तुम्हाला सोयीस्कर विसर पडला आणि सातारकरांना कास तुडुंब भरले असताना मुबलक पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. सातारकरांच्या समस्या सोडवणे हे आपले कर्तव्यच आहे. मात्र तुम्ही कोणावर तरी उपकार केल्याचा आव आणताय, यातही काही नवल नाही. काम मंजूर असले तरी पूर्ण होण्यास आणखी वर्षभर काळ लोटणार आहे. त्यामुळे सातारकरांना अजूनही वाटच पहावी लागणार आहे. आज मंजूर झालेले काम हे दोन वर्षांपूर्वीच व्हायला हवे होते, सातारकरांचे दुर्दैव दुसरे काय? सातारकर सर्वकाही उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. त्यामुळे मांजराला डोळे मिटून दूध पिणे लवकरच बाधक ठरेल, सातारकरांची काठी मांजराच्या पाठीत बसेल, असेही आ. शिवेंद्रराजे यांनी पत्रकात म्हटले आहे.

Back to top button