मलिदा लाटणार्‍या शेतकर्‍यांकडून वसुली; जिल्हाधिकारी पाठवणार नोटिसा | पुढारी

मलिदा लाटणार्‍या शेतकर्‍यांकडून वसुली; जिल्हाधिकारी पाठवणार नोटिसा

सातारा; पुढारी वृत्तसेवा : प्रधानमंत्री किसान सन्मान निधीला मलिदा लाटणार्‍या जिल्ह्यातील 32 हजार अपात्र शेतकर्‍यांकडून आता या रकमेची वसुली होणार आहे. दै.‘पुढारी’ने हा गोलमाल चव्हाट्यावर आणल्यामुळे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी याप्रश्नी कारवाईचा बडगा उगारला आहे. संबंधित शेतकर्‍यांना लवकरच वसुलीच्या नोटिसा पाठवण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी घेतला आहे. या कारवाईने संबंधित शेतकर्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

शेतकर्‍यांना केंद्र सरकारच्या वतीने आर्थिक सहाय्य म्हणून वार्षिक 6 हजार रुपये 3 टप्प्यात देण्याची योजना 3 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. त्यानुसार सध्या जिल्ह्यातील 4 लाख 58 हजार 527 नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांना आर्थिक सहाय्यता मिळत आहे. एकूण 4 लाख 58 हजार 527 शेतकर्‍यांना सध्या योजनेचा लाभ होत आहे. सातारा जिल्ह्यातील आयकर तथा इन्कम टॅक्स भरणार्‍या तब्बल 22 हजार 122 शेतकर्‍यांनीही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केली. एवढंच नव्हे तर शासनाने देखील पडताळणी न करता अशा शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर तब्बल 18 कोटी 61 लाख 90 रुपये वर्ग केले. मात्र, पुढे शासनाने केलेल्या पडताळणीत आयकर भरणार्‍या शेतकर्‍यांना अपात्र करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे पेन्शनधारक व एकाच कुटुंबातील दोन नोंदणी यासह निकषातील अनेक कारणांनी 9 हजार 844 शेतकर्‍यांना देखील शासनाने अपात्र ठरविले आहे. मात्र, तत्पूर्वी या अपात्र शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर तब्बल 2 कोटी 88 लाख 66 हजार रुपये एवढी मोठी रक्कम वर्ग करण्यात आली. ही सर्व रक्कम 3 कोटी रुपयांपर्यंत आहे. या घोटाळ्याला दै.‘पुढारी’ने वाचा फोडली. ‘अपात्र शेतकर्‍यांनी लाटला 21 कोटींचा मलिदा’ या मथळ्याखाली ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासन हडबडून जागे झाले. जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी ‘पुढारी’च्या या वृत्ताची गंभीर दखल घेत मलिदा लाटणार्‍या शेतकर्‍यांना वसुलीच्या नोटिसा पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच या नोटिसा पोहोचून शेतकर्‍यांकडून संंबंधित रक्कम वसूल केली जाणार आहे.

Back to top button