कराड : फुकट्या जाहिरातदारांमुळे विद्यानगरचे विद्रुपीकरण | पुढारी

कराड : फुकट्या जाहिरातदारांमुळे विद्यानगरचे विद्रुपीकरण

कराड; अशोक मोहने : अनधिकृत बांधकामावर नियंत्रण मिळविण्यात काहीसे यश मिळाले असले तरी सैदापूर ग्रामपंचायतीचे शहराच्या सौंदर्याकडे फारसे लक्ष नसल्याचे दिसते. फुकट्या जाहिरातदारांमुळे विद्यानगरचे विद्रुपीकरण होत असताना ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी हातावर हात ठेवून बसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. कृष्णा नाका ते बनवडी फाटा या एक-दीड कि.मी.च्या अंतरात विनापरवाना शेकडो बॅनर रस्त्याच्या दुतर्फा लागले आहेत. वीज वितरणचा प्रत्येक पोल हॉटेल, क्‍लासेस, खाद्य पदार्थांच्या जाहिरात फलकांनी दिसेनासे झाले आहेत.

विद्यानगर अस्वच्छता आणि अतिक्रमणामुळे नेहमीच चर्चेत असते. ग्रामपंचायत हद्दीत वाढलेली सिमेंटची जंगले, विस्तारलेली नागरी वस्ती यामध्ये मुलभूत सुविधा पुरविताना ग्रामपंचायतीची दमछाक होत आहे. विद्यानगरचा वाढता विस्तार लक्षात घेता काही बाबी ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. यातच काही दिवसांपासून विद्यानगरचे मोठ्या प्रमाणात विद्रुपीकरण सुरू आहे.

कृष्णा नाका ते बनवडी फाटा दरम्यान जाहिरातींचे शेकडो फलक ग्रामपंचायतीच्या परवानगी शिवाय लावण्यात आले आहेत. यामध्ये हॉटेलच्या, क्‍लासेसच्या, खाद्यपदार्थांच्या जाहिराती आहेत. तसेच इलेक्ट्रीक वस्तूंच्या विक्रीच्या जाहिरातींचे फलक आहेत. यावर ग्रामपंचायतीचे कसलेही नियंत्रण राहिलेले नाही. उत्साही कार्यकर्त्यांचे फलक अधूनमधून असतातच.अपवाद वगळता कोणत्याच फलकांसाठी सैदापूर ग्रामपंचायतींकडून परवानगी घेतली जात नाही. या विनापरवाना जाहिरात फलकांवर ग्रामपंचायत कारवाई करताना दिसत नाही. विद्यानगरचे विद्रुपीकरण होत असताना ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांना याचे काहीच वाटू नये याबाबत सूज्ञ नागरिकांमधून आश्‍चर्य व्यक्त होत आहे. ग्रामसेवक यांनी आजपर्यंत किती विनापरवाना जाहिरातदारांना नोटीसा बजावल्या याचे उत्तर देखील निराशाजनकच मिळते. विशेष बाब म्हणजे या रस्त्याकडेला वीज वितरणचे अनेक पोल आहेत. हे पोल जाहिरातींसाठीच उभा केले आहेत की काय अशी शंका येते. रात्री पोलवर चढून जाहिरातींचे फलक लावले जातात. एका पोलवर तीन ते चार बॅनर लागले आहेत. एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? मध्यंतरी फार्मसी कॉलेज समोर लावलेला जाहिरातीचा फलक अज्ञाताने फाडला होता. जाहिरात फलक लावण्यावरून व तो काढण्यावरून अनेकवेळा वादावादीचे तर कधी मारामारीचे प्रकार घडले आहेत.

विद्यानगरमध्ये बहुतेक शाळा, कॉलेज आहेत. त्यामुळे साहजीकच येथे मोठी वर्दळ असते. त्यामुळे खासगी क्‍लासेसकडून मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी सुरू असते. या जाहिरातींसाठी ग्रामपंचायतींचे परवाने घेतले जात नाहीत. रातोरात अनेक बॅनर रस्त्याच्या दुतर्फा झळकतात. विद्यानगरचे विद्रुपीकरण थांबवणार कोण हा प्रश्‍न आहे.

वीज कंपनीकडून काहीच कारवाई का नाही..

कृष्णा कॅनॉल ते बनवडी फाटा दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वीज वितरण कंपनीचे अनेक पोल आहेत. प्रत्येक पोलवर दोन ते तीन जाहिरातींचे फलक आहेत. ते लावताना युवक जीव धोक्यात घालून पोलवर चढतात. दुर्घटना घडल्यास याला जबाबदार वीज कंपनी राहणार आहे काय? पोल जरी सैदापूर ग्रामपंचायत हद्दीत असले तरी त्यावर लागल्या जाणार्‍या जाहिरातदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार वीज कंपनीला आहेत की नाही, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

Back to top button