सातारा : शालेय पोषण आहाराची फोडणी गुरुजींच्या खिशाला; स्वखर्चातून खरेदी करावा लागतोय भाजीपाला | पुढारी

सातारा : शालेय पोषण आहाराची फोडणी गुरुजींच्या खिशाला; स्वखर्चातून खरेदी करावा लागतोय भाजीपाला

सातारा; पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्या शालेय पोषण आहारातील भाजीपाला, तेल गॅस व अन्य साहित्यासाठी हजारो रुपयांची पदरमोड करावी लागत असल्याने गुरुजींच्या खिशाला शालेय पोषण आहाराची फोडणी बसत आहे. त्यामुळे शासनाकडून येणार्‍या अनुदानाची प्रतिक्षाच गुरुजींना करावी लागत आहे.

सातारा जिल्ह्यात 2 हजार 710 जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत. तर 767 माध्यमिक शाळा आहेत. या शाळेत हजारो विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांना दुपारच्यावेळी शालेय पोषण आहार शिजवून दिला जातो. सध्या दिवसेंदिवस गॅस, खाद्यतेलाचे भाव वाढत चालले आहेत. भाजीपाल्याचीही तशीच अवस्था आहे. शालेय पोषण आहार योजना शासनाने चांगल्या हेतूने सुरू केली असली तरी त्यासाठी आर्थिक पदरमोड ही गुरुजींना करावी लागत असल्याचे जिल्ह्यात ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे. शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी व्यावसायिक गॅस सिलिंडर घेण्यासाठी सुमारे 2 हजार 200 रुपये मोजावे लागत आहेत. सोयाबीन तेलाची पिशवीही 150 रुपयांच्या पुढे आहे. पूरक आहारात समाविष्ट भाज्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे शासनाने याबाबी पुरवण्याचे बंद केले आहे. मात्र त्यांची जबाबादारी गुरुजींच्यावर ढकलली आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशाला गुरुजींना नाही म्हणता येत नाही. शासनाचा आदेश पाळत गुरुजी आपल्या खिशातून भाजीपाला खरेदी करत असतात. मग त्यांना शासनाकडून ज्यावेळी अनुदान येते त्यातून आपले खर्च झालेले पैसे घेता येते. मात्र शासनाकडून 6 ते 7 महिने अनुदान वेळेवर येत नाही. त्यामुळे गुरुजींना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यातच शाळा सुरु होवून दोन महिने उलटून गेले असले तरी शाळेतील पोषण आहारासाठी लागणारे साहित्य संपले आहे.त्यामुळे ते साहित्यही आता खरेदी करावे लागतेय की काय असा प्रश्न शाळांमधील गुरुजींना पडला आहे. याकडे शालेय शिक्षण विभागाने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

शिकवायचे की भाजीपाला गोळा करायचा?

तेल व अन्य साहित्य महागले असल्याने ते शाळांना देण्याचे बंद केले आहे. त्यामुळे तेल व अन्य साहित्य घेण्याची जबाबदारी गुरूजींकडे सोपवली आहे. त्यामुळे गुरुजी चांगलेच आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाच्या फतव्यामुळे गुरुजी त्रस्त झाले आहेत. विद्यार्थ्यांनी ज्ञानदानाचे धडे द्यायचे की विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारासाठी भाजीपाला गोळा करावयाचा, असा प्रश्न आता गुरूजींना पडला आहे.

Back to top button