रानडुकरांकडून ऊस, पिकांचे नुकसान | पुढारी

रानडुकरांकडून ऊस, पिकांचे नुकसान

कण्हेर : पुढारी वृत्तसेवा सातारच्या पश्चिमेकडे असलेल्या कण्हेर परिसरातील जांभळेवाडी, गवडी व चोरगेवाडी या गावातील शेतकर्‍यांच्या ऊस पिकांचे रानडुकरांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे. डोंगर पायथ्याशी असलेल्या शेतातील उसाचे पीक खाऊन जमीनदोस्त करण्यात आल्याने शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला आहे. कण्हेरच्या दक्षिणेकडे असलेल्या डोंगर पठारावर मोठ्या प्रमाणात जंगल क्षेत्र आहे. त्यामुळे तेथे वन्यप्राणी विशेषतः रानडुकरे कळपा-कळपाने दिसून येत आहेत. या डोंगर पायथ्याशी अनेक छोट्या-मोठ्या वाड्या-वस्त्या वसलेल्या आहेत. बहुतांश गावातील लोकांची शेतीही डोंगर पायथ्याशी असून वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

जांभळेवाडी येथील शेतकरी रामदास जांभळे, सत्यवान जांभळे, समाधान जांभळे यांच्यासह अनेक शेतकर्‍यांच्या शेतातील उसाचे पीक खाऊन तुडवून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. दरम्यान रानडुक्कर व गवे यांच्या उपद्रव्यांमुळे येथील शेतकरी रात्री, सायंकाळी व पहाटे पिकाची राखण करण्यासाठी गस्त घालताना दिसत आहेत. शेतीची राखण करून देखील वन्यप्राणी कधीही येऊन उसाची पिके उध्वस्त करीत आहेत.आती कष्टातून उभारलेले व हातातोंडाशी आलेले ऊस पिकेही वन्य प्राण्यांकडून उद्ध्वस्त केली जात असल्याने शेतकर्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या परिसरातील जंगलांमुळे अनेक वन्यप्राणी हे रात्री अपरात्री शिवारांमध्ये भटकंती करताना दिसत आहेत. तसेच डोंगरामध्ये बिबट्यासारख्या हिस्त्र प्राण्यांचे वास्तव्य असल्याने अनेक वन्यप्राणी हे भीतीने शेत शिवारात फेरफटका मारताना दिसत आहेत. रानडुकरांचा वावर वाढल्याने या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा.तसेच शेतीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी होत आहे.

कण्हेर परिसरात वन्य प्राण्यांचा वावर आहे. या वन्यप्राण्यांकडून ऊस व ज्वारी सारख्या पिकांचे नुकसान करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. नुकसानीचे पंचनामे होवून भरपाईची मागणी करून सुद्धा गतवर्षीची भरपाई मिळालेली नाही. यामुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर शेतकर्‍यांमधून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
– समाधान जांभळे,
शेतकरी जांभळेवाडी

Back to top button