कोण चोर अन् कोण लुटारू हे सातारकरांनी ओळखलंय :आ. शिवेंद्रराजे | पुढारी

कोण चोर अन् कोण लुटारू हे सातारकरांनी ओळखलंय :आ. शिवेंद्रराजे

सातारा ; पुढारी वृत्रसेवा : गेल्या पाच-सहा वर्षांत नगर पालिकेला अक्षरशः धुवून खाल्लं. टक्केवारी, कमिशन, टेंडर आणि त्यातून पैसे मिळवण्यासाठी सत्तारूढ आघाडीत एकमेकांचे गळे धरणे आणि मारामार्‍या करणे, ही अनोखी परंपरा सातारकरांनी उघड्या डोळ्यांनी पाहिली आहे. त्यामुळे कोण चोर आणि कोण लुटारू? हे सातारकरांनी चांगलंच ओळखलंय. एक ना धड भाराभर चिंद्या असा कारभार पालिकेत पाहायला मिळाला. तुम्ही शहराच्या विकासासाठी वेगळं केलंय तरी काय?, असा सवाल आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, ज्या सर्वसामान्य महिलेला सातारकरांनी नगराध्यक्ष म्हणून निवडून दिले त्या माधवी ताईंना तुम्ही कामच करू दिले नाही, याचा खुलासा करण्याची हिम्मत उदयनराजेंनी दाखवावी, असा टोलाही आ. शिवेंद्रराजेंनी लगावला आहे.

पत्रकात आ. शिवेंद्रराजेंनी म्हटले आहे की, नागरिकांना मूलभूत सोयी- सुविधा पुरविणे हे तर नगरपालिकेचे कामच आहे. पण, तुम्ही ज्या विकासकामांची जंत्री जाहीर केली त्यातील एकतरी काम सातारकरांच्या उपयोगाचे आहे का? भुयारी गटर योजनेची वर्कऑर्डर 2018 ला निघाली. आजही या योजनेचे काम पूर्ण नाही, किंबहुना हे काम कधी पूर्ण होणार हे कोणालाच माहिती नाही. या योजनेमुळे शहरातील चांगल्या रस्त्यांची अक्षरशः धूळधाण झाली आणि हाच मुद्दा खासदार महोदयांना बोचला. घनकचरा प्रकल्पाची तर तर्‍हाच न्यारी आहे.

कचरा डेपोतील कचर्‍याचे ढीग रिकामे होणे अपेक्षित असताना कचर्‍याचे ढीगच्या ढीग साचत आहेत. ही योजना सपशेल फेल गेली असून केवळ ठेकेदाराला पोसण्याचा उद्योग सुरु आहे. ग्रेड सेप्रेटर म्हणजे तर ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ अशी परिस्थिती आहे. राजवाड्याकडून कलेक्टर ऑफिसकडे जायला मार्ग असणे आवश्यक होते मात्र, ग्रेडसेपरेटर म्हणजे नेमकं काय करून ठेवलंय हे एक कोडंच सातारकरांना पडलं आहे. यातही केवळ पैसे वाया घालवण्याचा प्रकार झाला आहे.

डंपर, डंपर करताय तो डंपर गेले तीन वर्षांपासून बंदच आहे, हे सातारकरांनाही माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याच्या कामात तर मोठा गोलमाल आहे. ग्रेड सेपरेटरऐवजी उड्डाण पुलाचा प्रस्ताव होता पण तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी उड्डाण पूल रद्द करून ग्रेड सेपरेटर मंजूर केला. त्यातले 80 लाख रुपये शिल्लक राहिले म्हणून त्यातून तुम्ही शिवतीर्थावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याचे काम सुरु केले. मात्र हे पैसेही संपले आणि काम अपूर्ण राहिले. वास्तविक या कामाचे कोणतेही नियोजन केले नाही.

शिवतीर्थ म्हणजे सातारकरांची अस्मिता आणि शिवप्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय. शिवतीर्थ म्हणजे प्रेरणास्थान. मग या कामासाठी लागणार्‍या निधीची पालिकेने आधीच तरतूद करणे आवश्यक होते. मात्र तुमच्या नाकर्तेपणामुळे आणि आडमुठ्या धोरणामुळे निधी अभावी हे कामही अर्धवट राहिले. स्वच्छता अभियानात पाचगणी, कराड शहरांनी बाजी मारली पण, जिल्ह्यातील मोठी पालिका असलेला सातारा, हे भूषणावह आहे का?

Back to top button