सातारा : कौशल्य शिक्षणाकडे कल, प्रवेशासाठी होतोय खल | पुढारी

सातारा : कौशल्य शिक्षणाकडे कल, प्रवेशासाठी होतोय खल

सातारा : मीना शिंदे

पारंपरिक अभ्यासक्रमांपेक्षा करिअर ओरिएंटेड असलेल्या कौशल्य शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. जिल्ह्यात आयटीआयसाठी 3900 जागा असून त्यासाठी तब्बल 8000 अर्ज आल्याने चुरस वाढली आहे. नवीन शैक्षणिक वर्षात आयटीआयच्या विविध प्रशिक्षणासाठी राज्यात दीड लाख प्रवेश क्षमता असून जिल्ह्यात 3 हजार 900 जागा आहेत. दहावी राज्य बोर्डाचा निकाल लागला असल्याने आयटीआय प्रशिक्षणासाठी तब्बल 8 हजार प्रवेश नोंदणी झाली आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश नोंदणी झाली असल्याने प्रत्यक्ष प्रवेशामध्ये चुरस वाढणार आहे.

मागील महिन्यात दहावी व बारावीचे निकाल लागले आहेत. त्यामुळे बहुतांश प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. दहावीनंतर अनेक विद्यार्थी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वळू लागले आहेत. पारंपारिक अभ्यासक्रमापेक्षा करिअर ओरिएंटेड असलेल्या कौशल्य शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. कौशल्य शिक्षण म्हणजेच आयटीआयची प्रवेश नोंदणी दि. 17 जूनपासून सुरू झाली आहे.
राज्यात आयटीआयच्या शासकीय 419, खासगी 553 अशा एकूण 972 प्रशिक्षण संस्था असून त्यामध्ये 1 लाख 49 हजार 268 प्रवेश क्षमता आहे. त्यापैकी जिल्ह्यात 11 शासकीय व 7 खाजगी अशा एकूण 18 प्रशिक्षण संस्था असून त्यामध्ये 3 हजार 900 इतकी प्रवेश क्षमता आहे.

व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय म्हणजेच डीव्हीईटीकडून आयटीआयच्या ऑनलाईन प्रवेशाची तयारी पूर्ण झाल्याने प्रवेश नोंदणी सुरु झाली आहे. सातारा जिल्ह्यातील शासकीय व खासगी प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी सुमारे 8 हजार प्रवेश नोंदणी झाली आहे. प्रवेश क्षमतेच्या तिप्पट प्रवेश मागणी असल्याने आयटीआय प्रवेशासाठी चांगलीच चुरस होणार आहे.

दरम्यान, राज्य बोर्डाचे निकाल लागले असले तरी अद्याप सीबीएसई व इतर मंडळांचे दहावीचे निकाल जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे अकरावी व समकक्ष अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या दुसर्‍या टप्प्यातील प्रक्रिया रखडली आहे. सीबीएसई व इतर बोर्डांच्या विद्यार्थ्यांसाठी ठराविक जागा राखीव ठेवून राज्य बोर्डाच्या निकालावर प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून जोर धरू लागली आहे.

Back to top button