आखाती देशाला पळशीच्या सीताफळाची गोडी | पुढारी

आखाती देशाला पळशीच्या सीताफळाची गोडी

पुसेसावळी : विलास आपटे

ओसाड माळरान आणि खडकाळ जमीन असली तरी चव आणि गुणवत्तेच्या बाबतीत पळशीच्या माळरानात पिकलेल्या सिताफळाची गोडी भलतीच न्यारी आहे. देशातील बाजारपेठे बरोबरच आखाती देशातील लोकांनादेखील पळशीच्या सिताफळाची गोडी लागली आहे. दुष्काळी भागातील शेतकर्‍याच्या या नवलाईचे सार्‍यानाच अप्रूप आहे.

खटाव तालुक्यातील पळशी हे गाव पाण्याचे दुर्भिक्ष असलेले.अवर्षणप्रवण क्षेत्रात असलेल्या गावातील शेतीतील बरेच क्षेत्र ओसाड माळरान आहे. जिल्हा बँकेचे संचालक माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून अर्थपुरवठा करून ओसाड माळरानावर हरितगृहात फुलांची शेती फुलवली होती. अल्पावधीतच येथील ग्रीनहाऊस शेतीचा पॅटर्न दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना आयडॉल ठरला होता.

हरितगृहातील जरबेरा फुलांचा राज्यासह देशातील बाजारपेठेत सुगंध दरवळला होता. फुल शेती बरोबर शेतीला फळबाग लागवडीची जोड दिली तर आर्थिकस्तर उंचावेल यामुळेच घार्गे यांनी शेतात सिताफळाची लागवड केली. सुमारे पंचवीस एकर क्षेत्रावर त्यांनी हैद्राबाद सिलेक्शन जातीच्या सिताफळाची लागवड केली आहे. चव, गोडी आणि गुणवत्ता आदी बाबतीत ही सिताफळ सरस असल्याने बाजारपेठेत राज्यातील इतर भागातून येणार्‍या सिताफळापेक्षा हैद्राबाद सिलेक्शन जातीच्या सिताफळाला चांगला दर मिळतो, शिवाय मोठी मागणी आहे.

खास करून कोकणात जास्त मागणी आहे. अनोना, प्रतिष्ठान, बाळानगरी, हनुमानफळ, हैद्राबाद सिलेक्शन हे सिताफळीचे आणखी वाण आहेत. सीताफळ पिकाला किडीचा जास्त प्रादुर्भाव होत नाही. काळे डाग पडू नये, याकरिता अगदी थोड्या औषधात चांगली फळधारणा होते. एका झाडापासून अंदाजे 100 किलो माल निघतो. शेतीत समतोल राखण्यासाठी शेतकर्‍यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता फळबाग लागवडीकडे वळणे गरजेचे आहे.

खाद्यपदार्थातही समावेश…

सिताफळापासून ज्युस, पल्प, कँडी, रबडी आदी पदार्थ बनवण्यात येतात शिवाय आईस्क्रीमसाठी देखील उपयोग केला जातो. वेगवेगळ्या खाद्यपदार्थात सिताफळाचा वापर केला जात आहे. त्यामुळे सिताफळाला बाजारात मागणी वाढली आहे.

Back to top button