सातारा : आषाढी एकादशीसाठी 175 बसेस | पुढारी

सातारा : आषाढी एकादशीसाठी 175 बसेस

सातारा : पंढरपूर येथील आषाढी एकादशी सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सातारा विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील सर्व आगारातून पंढरपूर येथे वारकरी व प्रवाशांसाठी जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. सुमारे 175 बसेस वारकर्‍यांच्या सेवेसाठी सोडण्यात येणार आहेत.

रविवार, दि. 10 जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आषाढी एकादशी सोहळा झाला नाही. मात्र, यावर्षी संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराजांचा पायी पालखी सोहळा सुरू झाला असून दोन्ही सोहळ्यांमध्ये वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. सातारा जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहून पंढरपूर येथे जाणार्‍या भाविकांसाठी महामंडळाच्या सातारा विभागामार्फत जादा एस.टी. सोडण्याचे नियोजन केले आहे. सातारा आगारातून 30, कराड 30, कोरेगाव 15, फलटण 25, वाई 10, पाटण 10, दहिवडी 13, महाबळेश्‍वर 7, मेढा 10, पारगाव खंडाळा 10, वडूज 15 अशा मिळून सुमारे 175 बसेस पंढरपूर यात्रेसाठी जादा सोडण्यात येणार आहेत.

त्यासाठी 2 लाख 38 हजार 500 किलोमीटर अंतर तर 95 लाख 40 हजार रुपयांचे उत्पन्न अपेक्षीत धरले आहे. जिल्ह्यातून पंढरपूर येथे जाणार्‍या भाविकांनी जादा बसेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी केले आहे. दरम्यान, संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून दि. 28 जून ते 4 जुलै असा मार्गक्रमण करणार आहे. संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यात माऊलींच्या दर्शनासाठी येणार्‍या वारकरी व भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी विविध आगारातून सुमारे 100 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. पालखी सोहळा मुक्कामाच्या ठिकाणी व त्या परिसरात असणार्‍या अन्य गावांसाठी या बसेस धावणार आहेत. विविध गावांमधील वारकर्‍यांनी समुहाने एस.टी.चे बुकिंग केल्यास त्याच गावातून एस.टी. सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी सुमारे 40 वारकरी समूहाने एकत्र आल्यास त्यांना घेवून गावातूनच एस.टी. थेट पंढरपूरला जाणार आहे.

Back to top button