घराला आग; आडीच लाखांचे नुकसान | पुढारी

घराला आग; आडीच लाखांचे नुकसान

कराड : पुढारी वृत्तसेवा कोयनानगर विभागातील दुर्गम कोळणे गावात घरास शॉर्टसर्किटने अचानक आग लागली. या आगीत घरातील रोख रक्कम, धान्य, कपडे, भांडी आदी संसारोपयोगी साहित्य जळाले. आगीचा पंचनामा करण्यात आला असून सुमारे 2 लाख 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. बुधवारी 22 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

कोळणे येथे बुधवारी दुपारच्या सुमारास ताईबाई दाजी डांगरे यांच्या राहत्या घराला शॉर्टसर्किटने अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच घरातील लोक तात्काळ घराबाहेर पडले. यावेळी ग्रामस्थांसह युवकांनी मिळेल त्या भांड्यातून पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केले होते. काही धाडसी युवकांनी घराच्या छतावर चढून कौले काढली व वरून पाणी ओतण्याचा प्रयत्न केला. सुमारे दोन तासानंतर आग आटोक्यात आणण्यात ग्रामस्थांना यश आले.

मात्र तोपर्यंत आगीत घरातील कपडे, धान्य, पेटीतील रोख रक्कम आदी सर्वकाही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. ग्रामस्थांनी वेळेत आग विझवल्याने लगतच्या घरांचा धोका टळला. या आगीत ताईबाई दाजी डांगरे यांचे 2 लाख 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
आगीची माहिती मिळताच तलाठी वैशाली जाधव, मंडलाधिकारी संजय जंगल यांच्यासह कोतवाल यांनी घटनास्थळी जावून आगीचा पंचनामा केला आहे. जळीतग्रस्तांना तात्काळ शासनानकडून भरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे.

Back to top button