सातारा जिल्ह्यात पालिकांमध्ये 180 जागा खुल्या | पुढारी

सातारा जिल्ह्यात पालिकांमध्ये 180 जागा खुल्या

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील सातारा, फलटण, कराड, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, रहिमतपूर आणि म्हसवड या आठ नगरपालिकांमधील सुमारे 211 जागांपैकी पन्नास टक्के जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. जवळपास 106 प्रभागांसाठी उद्या दि. 13 रोजी आरक्षण सोडत होणार आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे सुमारे 180 जागा खुल्या होणार आहेत. 28 जागा अनुसूचित जातीसाठी तर 3 जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होऊ शकतात.

जिल्ह्यातील आठ नगरपालिकांची प्रारूप प्रभाग रचना नुकतीच अंतिम करण्यात आली असून, मतदार याद्यांचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे. तत्पूर्वी, राज्य निवडणूक आयोगाने सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रमही प्रसिद्ध केला. त्यामुळे नगरपालिकांचे लवकरच धूमशान सुरू होणार असल्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी जोरदार राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, प्रभागांची आरक्षण सोडत न झाल्याने राजकीय घडामोडींना अपेक्षित वेग आला नसल्याचे चित्र आहे. भावी नगरसेवकांचे सगळे लक्ष प्रभागात कुठले आरक्षण पडतेय याकडे लागले आहे.

या आरक्षण सोडतीची नगरपालिका प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. आरक्षण सोडतीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. दि. 13 रोजी सकाळी 11 वाजता ही आरक्षण सोडत प्रशासनाने ठरवून दिलेल्या ठिकाणी होणार आहे. महाबळेश्वरची आरक्षण सोडत दुपारी 12 वाजता होणार आहे. लोकसंख्येच्या निकषावर प्रशासनाने प्रवर्गनिहाय आरक्षणाचा कोटा काढला आहे. त्यानुसार प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात कुठल्या प्रवर्गाचे किती सदस्य असतील याची संख्या निश्चित करण्यात आली आहे.

सातार्‍यात मल्हार पेठ, लक्ष्मी टेकडी, सदरबझारच्या काही भागात अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या जास्त असल्यामुळे याठिकाणच्या जागा एससीसाठी आरक्षित होऊ शकतात. तसेच करंजेतील टीसीपीसी परिसरात कातकरी वस्ती असल्यामुळे प्रभाग क्र. 1 हा अनुसूचित जमातीसाठी (एसटी) आरक्षित होऊ शकतो. अशीच परिस्थिती उर्वरित नगरपालिका क्षेत्रात आहे. नागरिकांचा इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे या जागा खुल्या प्रवर्गात गेल्या आहेत. त्यामुळे खुल्या प्रवार्गाच्या जागांमध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यातील नगरपालिकांच्या एकूण 211 जागांपैकी सुमारे 180 जागा या खुल्या होऊ शकतात. आरक्षण सोडतीवेळी प्रभागात कोणते आरक्षण पडणार याची उत्सुकता भावी नगरसेवकांना लागली असून, त्यांची धाकधूक वाढली आहे.

राज्य शासनाने लोकसंख्येची वाढ लक्षात घेऊन नगरपालिका वर्गवारीवरून सदस्यसंख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 8 नगरपालिका क्षेत्रात सुमारे 29 नगरसेवक सदस्य वाढणार आहेत. सातारा नगरपालिका सदस्यसंख्या 40 होती ती 50 झाली आहे. कराड 29 वरून 31, वाई 20 वरून 23, फलटण 25 वरून 27, महाबळेश्वर, पाचगणी, रहिमतपूर आणि म्हसवड नगरपालिकेची सदस्यसंख्या प्रत्येकी 17 वरून 20 इतकी झाली आहे. नगरपालिका क्षेत्रातील सदस्यसंख्येत वाढ झाल्याने इच्छुकांना संधी मिळणार आहे. आरक्षण सोडतीनंतर कोण कुठून लढणार, हे चित्र काहीसे स्पष्ट होईल.

Back to top button