सातारा जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीचा बिगुल लवकरच | पुढारी

सातारा जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीचा बिगुल लवकरच

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील सातारा, फलटण, कराड, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, रहिमतपूर आणि म्हसवड या नगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार असल्याची चिन्हे आहेत. प्रारुप प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर लगेचच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यापाठोपाठ मतदार यादी कार्यक्रमही राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी प्रसिध्द केला. दि. 21 जून रोजी प्रभागनिहाय प्रारुप व 5 जुलैला अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

एप्रिल 2020 ते जून 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या व नवनिर्वाचित नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रामुख्याने 3 टप्पे असतात. प्रभाग रचना, भारत निवडणूक आयोगाने विधानसभानिहाय तयार केलेल्या मतदार यादीचे केंद्रनिहाय विभाजन आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जातो.

विधानसभेची मतदार यादी नगरपरिषदांच्या प्रभागानुसार विभागून ती सार्वत्रिक निवडणुकीकरता तयार करणे व अधिकार्‍यांनी अधिसुचित करणे या प्रयोजनासाठी दि. 31 मे 2022 हा विहित दिनांक अधिसूचित केला आहे. या दिनांकास अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करुन ती निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे.

दि. 1 मे रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीचे नगरपालिका व नगरपंचायतींसाठी प्रभाग निहाय विभाजनासाठी राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. मतदार नोंदणी अधिकार्‍यांनी अंतिम निर्णय घेवून विधानसभा मतदार यादीमध्ये दाखल केलेली नवीन नावे, दुरुस्त्या इत्यादी नगरपरिषदा, नगरपंचायती प्राप्त करुन घेणार असून मतदारांचेही निवडणूक प्रभागनिहाय विभाजन करावे लागते.

नगरपालिका तसेच नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दि. 21 रोजी प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. दि. 27 रोजीपर्यंत प्रारुप मतदार यादीवर हरकती व सुचना दाखल करण्याचा कालावधी आहे. 1 जुलैपर्यंत अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करुन प्रसिध्द करण्यात येणार आहेत. दि. 5 जुलैला मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द करणे आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिध्द करण्यात येणार आहेत.

प्रारुप प्रभागनिहाय मतदार यादीवर नागरिकांकडून हरकती व सुचना मागवण्यासाठी प्रारुप मतदार यादीला संबंधित मुख्याधिकारी प्रसिध्दी देणार आहेत. त्यावर येणार्‍या हरकती व सुचना विचारात घेऊन संबंधित मुख्याधिकारी प्रभागनिहाय व मतदार केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द करणार आहेत.

हरकती व सुचनांवर फक्त काही प्रमाणात सुधारणा करता येतील. लेखनासंदर्भातील चुका, दुसर्‍या प्रभागातील मतदार चुकून समाविष्ट झाल्यास, विधानसभा मतदार यादीत मतदारांची नावे असूनही पालिकांच्या प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नावे वगळण्यात आली असल्यास त्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करता येवू शकतात.

Back to top button