गर्दीच्या मागे न जाता करिअरची निवड करा : प्रिया सावरकर | पुढारी

गर्दीच्या मागे न जाता करिअरची निवड करा : प्रिया सावरकर

सातारा : पुढारी वृत्तसेवा करिअरचे मार्ग अनेक आहेत. आपली गुणवत्ता, आवडीनुसार त्याची निवड करा. केवळ गर्दीच्या मागे जावू नका. हॉस्पिटॅलिटीमध्ये करिअरच्या अनेक संधी आहेत, असे प्रतिपादन पुणे येथील सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या प्रिया सावरकर यांनी केले. दै. ‘पुढारी’ आयोजित व संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत एज्युदिशा2022 या शैक्षणिक प्रदर्शनात विद्यार्थी व पालकांना करिअर अ‍ॅपॉर्च्युनिटी इन हॉस्पिटॅलिटी या विषयावर मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. प्रिया सावरकर म्हणाल्या, सगळेच मेडिकल, इंजिनिअरींगला जातात म्हणून केवळ त्यांचे अंधानुकरण करु नका. आपली गुणवत्ता व आवडीप्रमाणे करिअर निवडीला प्राधान्य द्या.

करिअरची अनेक क्षेत्रे आहेत. त्यापैकीच हॉस्पिटॅलिटी हे एक असून यात हॉटेल मॅनेजमेंट, ब्रेव्हरेज अ‍ॅण्ड हॉटेल सर्व्हिस, हाऊस किपींग, इव्हेंट मॅनेजमेंट, अ‍ॅग्रो टुरिझम, टुरिझम अ‍ॅण्ड हॉस्पिटॅलिटी यासारखे अनेक वेगवेगळ्या शाखांचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यातून तुम्हाला देश व परदेशात सेलीब्रेटी शेफ, फूड ब्लॉगींग, बेकींग अ‍ॅण्ड कुकींग, इव्हेंट मॅनेजर, सोशल मार्केटिंग अशा नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. कोणताही जॉब मोठा किंवा छोटा नसतो. त्यामधील आपली आवड महत्वाची असते, असेही त्या म्हणाल्या.

Back to top button