सातारा : बालवयातच मानगुटीवर बसतेय स्पर्धेचे भूत ; फाऊंडेशन कोर्सकडे पालकांचा वाढला कल | पुढारी

सातारा : बालवयातच मानगुटीवर बसतेय स्पर्धेचे भूत ; फाऊंडेशन कोर्सकडे पालकांचा वाढला कल

सातारा : मीना शिंदे
स्पर्धेच्या युगात आपल्या पाल्याचा निभाव लागण्यासाठी आठवी, नववीपासून जेईई, नीट परीक्षेसाठी अ‍ॅकॅडमीक फाऊंडेशन कोर्सचा घाट घालण्याकडे पालकांचा कल वाढला आहे. त्यामुळे खेळा-बागडायच्या वयातच स्पर्धेचे भूत या मुलांच्या मानगुटीवर बसत असून अपेक्षांचं ओझं लादलं जात आहे. अभ्यासाच्या टाईट वेळापत्रकामुळे बालपण हरवत असल्याचे मत मानसशास्त्र अभ्यासकांमधून व्यक्‍त होत आहे.

हल्ली खाजगी क्षेत्रातील अस्थिरता अनिश्‍चिततेमुळे शासकीय नोकरीतील स्थैर्य, मान मरातब यांचे आकर्षण वाटत असल्याने सर्वसामान्यांमध्येही स्पर्धा परीक्षांची क्रेझ वाढली आहे. स्पर्धा परीक्षेतील संघर्ष पाहता बहुतांश उच्चशिक्षीत पालक आपल्या मुलांना लहान वयातच स्पर्धा परीक्षांची पूर्व तयारी म्हणून विविध कोर्सला प्रवेश निश्‍चित करतात. बारावीनंतर विविध व्यवसाय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची तयारी करुन घेण्यासाठी आठवी, नववीपासून जेईई, नीट परीक्षेसाठी अ‍ॅकॅडमीक फाऊंडेशन कोर्सचा घाट घालण्याकडे पालकांचा कल वाढला आहे. त्यामुळे खेळा-बागडायच्या वयातच मुलांच्या मानगुटीवर स्पर्धेचे भूत बसत आहे.

डॉक्टर, इंजिनीअर प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळावेत यासाठी तीन ते चार वर्ष अगोदर पासूनच अ‍ॅकॅडमीला प्रवेश घेतला जातो. विद्यार्थी प्रवेश परीक्षेच्या तयारी सोबतच नियमित इयत्तेचे कोचिंग व अभ्यास करतात. त्याचबरोबर दैनंदिन शैक्षणिक कामकाजामधील इतर उपक्रमांमध्येही सहभागासाठी पालक आग्रही राहत आहेत. हे सगळं दिव्य पार पाडण्यासाठी आत्तापासून या मुलांचे वेळापत्रक आखले जात आहे. टाईट वेळापत्रकामुळे मुलांचे बालपण हरवत असून ही मुले मैदानी खेळ, गप्पा, भांडणे आदिंचे शेअरींग आणि केअरींगपासूनही दुरावत आहेत. ही मुले एकलकोंडी होत असून सतत तणावात राहत आहेत. निकोप आणि आनंदी बालपणासाठी या मुलांना हसतखेळत शिक्षण मिळण्याची गरज तज्ञांमधून व्यक्‍त होत आहे.

संबंधित बातम्या

शैक्षणिक फॅक्टर्‍यांचे पेव वाढतेय…

शाळेतील शिक्षकांची जागा घेवू पाहणार्‍या शैक्षणिक फॅक्टर्‍यांचे पेव वाढत असून त्यांच्याकडून प्रवेश परीक्षांसाठी हजारो रुपयांची पॅकेज जाहीर केली आहेत. त्यांच्याकडून आठवीपासूनच जेईई, नीटची तयारी आणि विद्यार्थी अकरावीला गेला की याच परीक्षांची अ‍ॅडव्हान्स तयारीचे नियोजन केले जात आहे. जास्त काळ विद्यार्थी अभ्यास करत राहत असून त्यापोटी पालकांकडून हजारो रुपये घेवून चांगल्या कॉलेजला डॉक्टर, इंजिनीअरसाठी प्रवेशाची स्वप्न आठवीपासूनच पाहिली जात आहेत.

हेही वाचलत का ?

 

Back to top button