सातारा : बेल एअरच्या कारभाराचे पोस्टमॉर्टम ; तळदेव, तापोळा आरोग्य केंद्राची तपासणी | पुढारी

सातारा : बेल एअरच्या कारभाराचे पोस्टमॉर्टम ; तळदेव, तापोळा आरोग्य केंद्राची तपासणी

सातारा : प्रविण शिंगटे
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या चार पथकांनी बेल एअर हॉस्पिटलमार्फत चालवण्यात येणार्‍या तळदेव व तापोळा या आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत असलेल्या उपकेंद्रांची पाहणी करून सीईओंना दिलेल्या अहवालात अनेक धक्‍कादायक बाबी उघडकीस आल्या आहे. या पथकाच्या अहवालात बेल एअरकडून होत असलेल्या कारभाराचे पोस्टमॉर्टम केले आहे. ही केंद्रे बेलएअरकडून काढून आरोग्य विभागाला चालवण्यासाठी द्यावे, अशी शिफारस पथकातील अधिकार्‍यांनी सीईओ विनय गौडा यांच्याकडे केली आहे.

पाचगणी येथील बेल एअर हॉस्पिटलमार्फत महाबळेश्‍वर तालुक्यातील तळदेव व तापोळा या दोन प्राथमिक आरोग्य केंद्राची व अंतर्गत 14 उपकेंद्रापैकी 4 उपकेंद्रांची पाहणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या 4 पथकामार्फत डिसेंबर महिन्यात करण्यात आली होती. यातील प्रत्येक पथकाने आरोग्य केंद्र व उपकेंद्राची पाहणी करून तेथील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व रहिवाशांशी संवाद साधला. तसेच विविध प्रकारच्या रजिस्टर्सची तपासणीही केली. बेलएअर संस्थेला कामकाज दिल्यानंतर तांत्रिक निर्देशकामध्ये गुणवत्ता वाढ उल्लेखनीय दिसून येत नाही. प्रत्यक्षामध्ये सेवा दिल्या नसल्या तरी अहवालात मात्र नोंदी घेतल्या जात आहेत.

उपकेंद्र स्तरावरील तांत्रिक कर्मचारी वारंवार बदलले जात आहेत. त्यामुळे त्यांना आरोग्य विषयक योजना माहिती नसल्याने या भागातील नागरिकांना आरोग्य सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. कर्मचार्‍यांची भरती करणे व वेतन अदा करणे याशिवाय इतर सर्व कामे आरोग्य विभागाकडून केली जातात. त्यामुळे या संस्थेचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे शासनाने बेल एअरला चालवण्यास दिलेली केंद्रे काढून घ्यावी. याबाबतचा शासन निर्णय रद्द करावा. ही केंद्रे पूर्वीप्रमाणे आरोग्य विभागामार्फत चालवण्यास द्यावी. दुर्गम भाग असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी बाह्य यंत्रणेद्वारे नियुक्त करण्यासाठी परवानगी देण्यात यावी. जेणेकरून स्थानिक कर्मचार्‍यांच्या सेवा दुर्गम भागात मिळतील.

जिल्हा परिषद आस्थापनेमधील नियमित कर्मचारी संवर्गनिहाय एका वर्षाकरता प्रतिनियुक्ती रोटेशननुसार देवून कामकाज करून घेण्यात यावे अशी शिफारस करण्यात आली आहे. या शिफारशीवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के, कुष्ठरोगचे सहाय्यक संचालक डॉ. राजेश गायकवाड, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अविनाश पाटील, प्रशासकीय अधिकारी डॉ. अशोक मासाळ, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अश्‍विनी जंगम यांच्या सह्या असून त्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना दिला आहे.

पाहणीवेळी आरसीएचविषयी केलेल्या कामकाजाची नोंद न करणे, कायक्षेत्राबाहेरील गरोदर मातांची संख्या जास्त असणे, गरोदर मातांच्या नोंदवह्या अद्ययावत न ठेवणे, लससाठा व वितरणात फरक, लोहगोळ्यांच्या वापराविषयी कर्मचार्‍यांना पुरेसे ज्ञान नसणे, विविध योजनांची माहिती कर्मचार्‍यांना नसणे, एसबी टेस्टिंगबाबत चुकीच्या पध्दतीचा वापर करणे, प्रसुती व्यवस्थापनाबाबत परिचारिकेस पुरेशी माहिती नसणे आदी गंभीर बाबी समोर आल्या. प्रसुती व लसीकरणास कार्यक्षेत्राबाहेर जावे लागत आहे. तळदेव व तापोळा इमारतीमध्ये ऑपरेशन थिएटर बंद आहेत. कार्यक्षेत्रातील कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया ग्रामीण रूग्णालय महाबळेश्‍वर येथे केल्या जातात परंतू त्यांच्या नोंदी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रजिस्टरला नोंदवण्यात आलेल्या आहेत. शस्त्रक्रिया झाल्यानंतर देण्यात येणारे लाभ लाभार्थ्यांना दिले गेले नाहीत, अशा नोंदी या पथकाने केल्या आहेत. याचा अहवाल आता सीईओ गौडा यांच्यामार्फत शासनाला पाठवण्यात येणार आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button