….तर निवडणुकीच्या प्रचाराचे भोंगे बंद करा; बच्चू कडू यांची राज ठाकरेंवर टीका | पुढारी

....तर निवडणुकीच्या प्रचाराचे भोंगे बंद करा; बच्चू कडू यांची राज ठाकरेंवर टीका

मुंबई; पुढारी ऑनलाईन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यावरून राजकीय वातावरण तापविले आहे. त्यांनी भोंग्याबाबत राज्य सरकारला ३ मे रोजीचा अल्टीमेटम दिलाय. त्याचबरोबर ५ जून रोजी अयोध्या दौऱ्याचीही घोषणाही केलीय. या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी राज ठाकरे यांच्यावर ट्विट करत टीका केली आहे. ”मागील दोन वर्ष महाराष्ट्र कोरोनात होरपळत असताना मंदिर, मशिद, राजकीय सभा सगळे आवाज बंद होते. एकच आवाज ऐकायला यायचा सेवेचा व रुग्णवाहिकेचा. यातून प्रत्येकांनी बोध घ्यायला हवे. बंद करायचे असेल तर मंदिर, मशिद, सगळी धार्मिक स्थळे व सर्वात पहिले निवडणुकीच्या प्रचाराचे भोंगे बंद करा…” असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ३ मेपर्यंतची मुदत दिली असतानाच सर्व धार्मिक स्थळांवर भोंगे लावण्यासाठी नियम तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मनसेला रोखण्यासाठीच राज्य सरकारने हे पाऊल टाकल्याचे समजते. दुसरीकडे मशिदींच्या शंभर मीटर परिघात भोंगे लावण्यासाठी पूर्वपरवानगी न घेतल्यास सरळ तुरुंगवासाची तरतूद करणारा नियम लागू करण्यात आला आहे. राज्यभरात मनसेला रोखण्यासाठी हाच नाशिक पॅटर्न वापरला जाईल, असे स्पष्ट संकेत आहेत.

मनसेने दिलेल्या इशार्‍याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे– पाटील यांनी सोमवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून सोमवारी हा निर्णय जाहीर केला. वळसे-पाटील म्हणाले, प्रार्थनास्थळांवर भोंगे लावण्यासंदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त एकत्रित बसून निर्णय घेतील. ते नियमावली तयार करतील ती राज्याला लागू केली जाईल. राज्यासाठी अधिसूचना काढली जाईल आणि ही नियमावली लागू करण्यात येईल. हे नियम तोडणार्‍याविरोधात कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

 

Back to top button