कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : महाविकास आघाडीची फौज; तरीही विजयासाठी दमछाक! | पुढारी

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : महाविकास आघाडीची फौज; तरीही विजयासाठी दमछाक!

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला. मात्र, हा विजय मिळविण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची अक्षरश: दमछाक झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे महाविकास आघाडीतील घटकपक्ष तसेच शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पक्ष व अन्य छोट्या-मोठ्या संघटना सोबत असूनही काँग्रेसला अपेक्षित मतांची आकडेवारी गाठता आली नाही. शिवसेनेचे 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवार राजेश क्षीरसागर यांना मिळालेली 75 हजार 854 मते पाहता काँग्रेसच्या विजयी उमेदवार जयश्री जाधव यांची एकूण मते दीड लाखावर जाणे अपेक्षित होते. मात्र, महाविकास आघाडीची मोट बांधूनही ती 97 हजार 332 पर्यंतच थांबली. शिवसेनेची मते भाजपकडे वळल्याचे स्पष्ट होते.

महाविकास आघाडीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील यांनी जाधव यांच्या विजयासाठी टाकलेले डावपेच यशस्वी झाले खरे; मात्र शिवसेनेचा पाठिंबा घेऊनही न मिळालेल्या मतांच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. शिवसेनेची हक्‍काची मते कोणाच्या पारड्यात पडली? ती कोणत्या कारणामुळे पडली? शिवसेनेतील गटबाजीमुळे की अन्य कोणत्या कारणांमुळे, याची बूथवार माहिती काँग्रेसकडून घेतली जात असल्याची माहिती आहे. यापूर्वीच्या मतदानाचे आकडे पाहता 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय मंडलिक यांना कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून 1 लाख 1 हजार 892 मते मिळाली होती. राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांना 74 हजार 237 मते मिळाली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांना 91 हजार 53 मते मिळाली होती. शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांना 75 हजार 854 मते मिळाली होती. यापूर्वीच्या 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेचे राजेश क्षीरसागर विजयी झाले होते. त्यांना 69 हजार 736 मते मिळाली होती. पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांनी तेव्हा काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढविली होती तेव्हा त्यांना 47 हजार 315 मते मिळाली होती तर भाजपचे महेश जाधव यांना 40 हजार 104 मते मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आर. के. पोवार यांना 9 हजार 887 मते मिळाली होती.

शिवसेनेची गठ्ठा मते भाजपकडे वळल्याचा संशय

काँग्रेसचे दिवंगत आमदार यांची 91 हजार 53 तसेच शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांची 75 हजार 854 मते मिळाली होती. या दोन्ही मतांची बेरीज 1 लाख 66 हजार 907 एवढी होते. काँग्रेस आणि शिवसेना या निवडणुकीत एकत्र होते. त्याशिवाय 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार आर. के. पोवार यांना 9 हजार 887 मते मिळाली होती. 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार रिंगणात नसला तरी काँग्रेस आणि शिवसेेनेची 1 लाख 66 हजार 907 मते होती तर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना 1 लाख 1 हजार 892 एवढे मतदान कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाने दिले होते. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांसह शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पक्ष व अन्य संघटना यांनी लावलेली ताकद पाहता सहजपणे मतांची बेरीज दीड लाखांवर जायला हवी होती. पण काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांना 97 हजार 332 एवढ्याच मतांवर समाधान मानावे लागले. त्यांना मताचा एक लाखांचा टप्पाही गाठता आला नाही. त्यामुळे काँग्रेसला कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत विजय मिळविण्यासाठी दमछाक करावी लागली. पक्षाचे अनेक नेते, महाविकास आघाडीचे मंत्री, आमदार, खासदार हे कोल्हापुरात तळ ठोकून राहिलेच. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही कोल्हापुरात राहून नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या जोडण्या कराव्या लागल्या.

यामागे भाजपने काँग्रेस उमेदवारासमोर उभा केलेले आव्हान हे एकमेव कारण आहे. 40 हजार मते मिळविणारा भाजप आणि काँग्रेसकडून निवडणूक लढवून सत्यजित कदम यांनी 47 हजार 315 मते मिळविली होती. कदम यांनी भाजपकडून पोटनिवडणूक लढविताना आपल्या मताचा गठ्ठा कायम राखला आहे. भाजपची 40 हजार मते त्यांना मिळालीच. त्याशिवाय त्यांनी 2014 मध्ये शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांची 75 हजार 854 मतांपैकी बहुतांश मते मिळविली. त्यांना 78 हजार 25 मते मिळाली. भाजपच्या उमेदवाराने काँग्रेसला विजयासाठी दमछाक करायला लावली हे आकडेवारीतून स्पष्ट होते.

  • लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमधून
    शिवसेनेला 1 लाख 1 हजार 892 मते.
  • 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला
    91 हजार 53, तर शिवसेनेला 75 हजार 854 मते
  • दोन्ही मिळून 1 लाख 66 हजार 907 मते
  • जयश्री जाधव यांना केवळ 97 हजार 332 मते

शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांना मिळालेली मते
2019 : 75,854
2014 : 69,736
काँग्रेस उमेदवारास मिळालेली मते
चंद्रकांत जाधव 2019 : 91,053
जयश्री जाधव 2022 : 97,332
सत्यजित कदम यांना मिळालेली मते
2014 : 47,350 (काँग्रेस)
2022 : 78,025 (भाजप)

भाजपचे कडवे आव्हान!

यापूर्वीच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांतील पक्षनिहाय मतांच्या आकडेवारीचा विचार करता, काँग्रेस उमेदवाराला पोटनिवडणुकीत किमान दीड लाख मते मिळायला हवी होती. मात्र, त्यांना एक लाखाचा टप्पा गाठता आला नाही आणि भाजपने त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभा केल्याने विजयासाठी काँग्रेसला दमछाक करावी लागली.

शिवसेनेची गठ्ठा मते गेली कुठे?

शिवसेनेचे सगळे गट या निवडणुकीत एकत्र आले होते. याशिवाय मुंबईहून आलेले नगरसेवक व नेते कोल्हापुरात तळ ठोकून होते. त्यामध्ये उदय सामंत, विनायक राऊत, अरुण दुधवडकर आदींचा समावेश होता. लोकसभेला शिवसेनेची 1 लाख 1 हजार 892 मते, विधानसभेतील 75 हजार 854 मते हे गठ्ठा मतदान गेले कुठे? असा प्रश्‍न जयश्री जाधव यांना मिळालेली मते पाहिल्यानंतर पडतो. शिवसेनेची ही गठ्ठा मते गेली कुठे? ती जर काँग्रेसला मिळाली असती, तर जयश्री जाधव यांची मते व मताधिक्य वाढले असते. मात्र, ही गठ्ठा मते भाजपकडे वळल्याचा संशय व्यक्‍त होत आहे.

भाजपची 22 टक्के, तर महाविकास आघाडीची 2.23 टक्के मते वाढली, हिंदुत्ववाद्यांची मते भाजपच्या पारड्यात

शिवसेनेने भाजपला सोडले… हिंदुत्व सोडलेले नाही, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले असले; तरी कोल्हापुरातील हिंदुत्व मानणार्‍या कार्यकर्त्यांची मते ही भाजपच्या पारड्यात पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. कारण, या निवडणुकीत महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र येऊनही एकूण मिळालेली मते पाहता त्यांच्या मतांत केवळ 2.23 टक्के वाढ झाली. तर स्वतंत्रपणे निवडणूक लढवलेल्या भाजपच्या मतांत 22 टक्के इतकी मोठी वाढ झाली आहे.

कोल्हापूर उत्तर शिवसेनेचा एकेकाळचा बालेकिल्ला; पण पक्षप्रमुखांचा आदेश व महाविकास आघाडीचा धर्म पाळत शिवसैनिकांनी हा मतदारसंघ काँग्रेसला बहाल केल्याने शिवसेनेला पुन्हा आपले वर्चस्व निर्माण करताना बराच राजकीय संघर्ष करावा लागणार आहे.
आ. चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघात मध्यावधी निवडणुका लागल्या. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळावी म्हणून शिवसेनेनेही आग्रह धरला. त्यामुळे नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत संभ्रम होता. काँग्रेसने महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांचे नाव निश्‍चित केले. दुसरीकडे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळा, असे सांगत माजी आ. क्षीरसागर यांना महाविकास आघाडीच्?या उमेदवाराचा प्रचार करण्?यास सांगितले. शिवसैनिकही कामाला लागले.

भाजपने प्रचार करताना कडवा शिवसैनिक जो हिंदुत्व मानणारा आहे तो काँग्रेसला मतदान करणार नाही. हिंदुत्व हे त्यांच्या रक्तातच आहे, त्यामुळे शिवसेनेची मते भाजपला मिळणार, असे सांगितले. मतदानाच्या दोन दिवस अगोदर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. भाजपच्या आरोपाला उत्तर देताना ठाकरे यांनी शिवसेनेने भाजपला सोडले, हिंदुत्व सोडलेले नाही, असे सांगितले.

हाच संदर्भ घेतला तर हिंदुत्व मानणार्‍या शिवसेनेची मते भाजपला पडली की महाविकास आघाडीला हा चर्चेचा विषय ठरला आहे.
2019 ला काँग्रेस उमेदवार चंद्रकांत जाधव यांना 91 हजार 053 मते मिळाली . शिवसेना उमेदवार राजेश क्षीरसागर यांना 75 हजार 854 मते मिळाली. तेव्हा भाजपने अपेक्षीत साथ दिली नसल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. 2022 च्या निवडणूकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे तिनही पक्ष एकत्र आले. पण 2019 च्या निवडणूकीच्या तुलनेत या तीनही पक्षांचा मतदानात केवळ 2.23 टक्के वाढ झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला. पण भाजपने घेतलेली मतांची गरूड झेप ही दुर्लक्षून चालणार नाही. त्यांना मिळालेली मते ही शिवसेनेची नसतीलही. हिंदुत्ववादी कार्यकर्ता जर हिंदुत्व मानणार्‍या पक्षासोबत राहीला असेल तर या निवडणूकीत तो भाजप सोबत राहीला असणार म्हणूनच त्यांच्या मतांच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे बालले जात आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेनेला पुन्हा हिंदुत्वाचा मुद्या घेवून मते मागताना संघर्ष करावा लागणार आहे.

Back to top button