किसनवीर साखर कारखान्याच्या निवडणुकीत आता खरी रंगत | पुढारी

किसनवीर साखर कारखान्याच्या निवडणुकीत आता खरी रंगत

वाई ; पुढारी वृत्तसेवा : किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी 195 जणांनी रणांगणातून माघार घेतली. त्यामुळे आता 241 पैकी 46 जण रणांगणात उरले आहेत. कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले व आमदार मकरंद पाटील यांच्या गटातच थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, दोन पंचवार्षिक निवडणुकांनंतर म्हणजे तब्बल दहा वर्षांनी ‘किसनवीर’साठी धूमशान रंगणार आहे.

किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आता खरी रंगत निर्माण होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासूनच ही निवडणूक गाजत आहे. प्रारंभीच अर्ज वैध ठरवण्यावरून बराच गोंधळ उडाला. त्यानंतर मात्र अर्ज मागे घेण्यासाठी तब्बल 12 दिवसांचा कालावधी असतानाही एकही अर्ज मागे घेण्यात आला नव्हता. मंगळवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत होती. यावेळी 241 पैकी 195 जणांनी रणांगणातून माघार घेतली. त्यामुळे आता 21 जागांसाठी 46 जण रणांगणात उरले आहेत.

कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले व आमदार मकरंद पाटील यांच्या गटातच सरळ लढत होणार असून, या दोन्ही पॅनेलमधून 42 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर चार जण अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत. भुईंज मतदार संघातून मानसिंग नारायण शिंगटे हे अपक्ष आहेत. कोरेगांवमधून दिलीप उध्दव जाधव, रमेश दगडू माने, सातारामधून नवनाथ रघुनाथ साबळे हे अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.

राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी असे चित्र असताना किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये नवीन राजकीय समीकरण उदयास येताना दिसत आहे. आ. मकरंद पाटील हे राष्ट्रवादीत आहेत तर कारखान्याचे चेअरमन मदनदादा भोसले भाजपमध्ये आहेत. असे असले तरी येथे पक्षीय राजकारण होईल असे वाटत नाही. स्थानिक आघाडीचे राजकारणच मोठ्या प्रमाणात रंगणात असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.

चिन्ह वाटप आज; उद्यापासून फैरी झडणार

किसनवीर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक ही भोसले-पाटील गटात मोठ्या प्रतिष्ठेची झाली असून, दोन्ही बाजूंनी येत्या काळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. बुधवार, दि. 20 एप्रिल रोजी चिन्ह वाटप होणार असून, गुरुवार (दि. 21) पासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. मतदान 3 मे रोजी असून, मतमोजणी 5 मे रोजी होणार आहे.

आ. मकरंदआबा व मदनदादा गटातील हे उमेदवार भिडणार….

आ. मकरंद पाटील व सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली किसनवीर बचाव शेतकरी पॅनेल स्थापन करण्यात आले आहे. या पॅनेलमध्ये कवठे-खंडाळा ऊस उत्पादक गटातून नितीन लक्ष्मणराव जाधव (पाटील), रामदास संपतराव गाढवे, किरण राजाराम काळोखे, भुईंज ऊस उत्पादक गटातून प्रमोद भानुदास शिंदे, रामदास महादेव इथापे, प्रकाश लक्ष्मण धुरगुडे, वाई-बावधन-जावळी ऊस उत्पादक गटातून शशिकांत मदनराव पिसाळ, दिलीप आनंदराव पिसाळ, हिंदुराव आनंदराव तरडे, सातारा ऊस उत्पादक गटातून संदीप प्रल्हाद चव्हाण, बाळासाहेब शिवाजी कदम, सचिन हंबीरराव जाधव, कोरेगांव ऊस उत्पादक गटातून सचिन घनशाम साळुंखे, ललित ज्योतीराम मुळीक, संजय अरविंद फाळके, सोसायटी मतदार संघातून आ. मकरंद लक्ष्मणराव जाधव (पाटील), महिला राखीव मतदार संघातून सुशीला भगवानराव जाधव, सरला श्रीकांत वीर, अनुसूचित जाती/ जमाती राखीव संजय निवृत्ती कांबळे, विमुक्त जाती/भटक्या जमाती / विशेष मागास प्रवर्ग हणमंत बाळासाहेब चावरे, ओबीसी मधून शिवाजीराव बंडू जमदाडे हे निवडणूक रिंगणात उभे आहेत.

माजी आमदार मदन भोसले यांच्या शेतकरी विकास पॅनेलमधून कवठे-खंडाळा ऊसउत्पादक गटात दत्तात्रय गणपतराव गाढवे, प्रवीण विनायक जगताप, प्रताप ज्ञानेश्वर यादव, भुईंज ऊस उत्पादक गटातून मदन प्रतापराव भोसले, जयवंत सुर्यकांत पवार, दिलीप भीमराव शिंदे, वाई-बावधन-जावळी ऊस उत्पादक गटातून चंद्रसेन सुरेशराव शिंदे, सचिन आप्पासाहेब भोसले, विश्वास रामराव पाडळे, सातारा ऊस उत्पादक गटातून भुजंगराव जिजाबा जाधव, चंद्रकांत बजरंग इंगवले, अनिल पांडुरंग वाघमळे, कोरेगांव ऊस उत्पादक गटातून मेघराज सुरेश भोईटे, नवनाथ निवृत्ती केंजळे, शिवाजी रामदास पवार, तर सोसायटी मतदार संघातून रतनसिंह सर्जेराव शिंदे, महिला राखीव मतदार संघातून विजया जयवंत साबळे, आशा दत्तात्रय फाळके, अनुसूचित जाती/ जमाती राखीव सुभाष तात्याबा खुडे, विमुक्त जाती /भटक्या जमाती / विशेष मागास प्रवर्ग चंद्रकांत वामनराव काळे, ओबीसी मधून आनंद कोंडीबा जमदाडे हे निवडणूक रिंगणात उभे आहेत.

Back to top button