सातारा : कोयनेचं बोटिंग अजूनही अधांतरीच | पुढारी

सातारा : कोयनेचं बोटिंग अजूनही अधांतरीच

सातारा : गणेशचंद्र पिसाळ
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सातारा जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी कोयना शिवसागर जलाशयात स्कुबा डायव्हिंग, जेट स्की आदी जल पर्यटनासाठी तब्बल पन्नास कोटींची घोषणा उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री ना. अजित पवार यांनी केली. ज्या भूमिपुत्रांच्या त्यागावर कोयना धरण उभे राहिले त्यांच्या रोजगार,व्यवसायावर गंडांतर आणत कोयना धरण परिसरातील बोटींग तब्बल सात वर्षे बंद आहे.

राज्यकर्त्यांकडून यासाठी केवळ तारीख पे तारीख सुरू असून अशा आधुनिक पद्धतीच्या जलपर्यटनासाठी धरणाच्या आजूबाजूचा पाण्याची ज्यादा खोली असणारा परिसरच महत्वाचा असल्याने निदान याचा अभ्यास करून तरी कोयनेचे बंद बोटींग सुरू करून हा निधी सार्थकी लावावा अशा मागण्या होत आहेत . जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून कोयना धरणात आधुनिक जल पर्यटन सुरू करण्यात येणार आहे.

कोयना जलाशयात स्कुबा डायव्हिंग सुरू करून पाण्यात जास्त वेळ नियंत्रित पद्धतीने रहाण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने याबाबत संबंधितांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. या सोबतच वॉटर स्पोर्टच्या दृष्टीने वॉटर बोट, किंवा जेट स्की देखील सुरू करण्यात येणार आहे.जिल्हा पर्यटनाचा प्रस्ताव राज्य शासनाला देऊन ना. अजित पवार त्यांच्यासोबतच्या बैठकीनंतर त्यांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊनअर्थसंकल्प अधिवेशनात यासाठी पन्नास कोटींची तरतूद जाहीर केली आहे. यामध्ये साहसी वॉटर स्पोर्ट्समध्ये स्कुबा डायव्हिंग,पॅरासेलिंग, जेट स्की, वाइल्ड लाइफ सफारी, बोट राईड ,गिर्यारोहक आदी प्रकारांना उत्तेजन देण्यात येणार आहे .यासाठी संबंधितांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. प्रशासनाकडून यासाठी सकारात्मक प्रयत्न सुरू असून जिल्हाधिकारी शेखर सिंह याचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत .

कोयना धरण परिसरात वर्षांनुवर्षे सुरू असणारे बोटिंग गेल्या सात वर्षापासून धरण सुरक्षेचा बागुलबुवा करत बंद पाडण्यात आले. यातूनच स्थानिकांचे कोट्यवधींचे नुकसान होऊन कोयना पर्यटनावरही गंभीर परिणाम झाले. याच भागातील लोकांना नैसर्गिक आपत्तीत भूकंप, अतिवृष्टी, महापूर, अलीकडचे भूस्खलन यासह स्थानिकांच्या मानगुटीवर बसवलेले सह्याद्री व्याघ्र, पश्चिम घाट प्रकल्प, इको सेन्सिटिव्ह झोन, कोयना अभयारण्य यामुळे स्थानिक मेटाकुटीला आलेत. या सर्व बाबींवर मात करून स्थानिकांना बळकटी द्यायचे असेल तर पर्यटनशिवाय पर्यायच नाही व त्यासाठी धरण परिसरातील बोटिंग तातडीने सुरू करणे काळाची गरज आहे . वास्तविक स्कुबा डायव्हिंग आदीसाठी ज्या ठिकाणी जास्त पाण्याची खोली असेल असा परिसर आवश्यक असतो.

धरण भिंतीच्या आजूबाजूलाच अशाप्रकारे पाण्याचा साठा आहे. पावसाळ्यात जल पर्यटन बंद असते व हिवाळा, उन्हाळ्यात त्याला गती येते. कोयना ते तापोळा या साडेसदुसष्ट किलोमीटरच्या अंतरावर टाईम पर्यटनाच्या जल पर्यटनाच्या हंगामात धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी असते. त्यामुळे या आधुनिक जल पर्यटनासाठी कोयना धरण परिसरच योग्य असल्याने या जल पर्यटनाच्या पन्नास कोटी निधीसाठी कोयना धरण परिसराची सहानुभूतीने निवड व्हावी, अशी मागणी होत आहे.

Back to top button