सातारा : गुरुवार पेठेतील ‘त्या’ युवकाचा खून? | पुढारी

सातारा : गुरुवार पेठेतील ‘त्या’ युवकाचा खून?

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : येथील गुरुवार पेठेतील मुकुंद गोविंद अडागळे (वय 20) या युवकाचा गुरुवारी सायंकाळी बेशुद्ध अवस्थेत असतानाच मृत्यू झाला. हा आकस्मिक मृत्यू नसून घातपाताची शक्यता असल्याने पोलिसांनी या मृतदेहाचा अंत्यविधी रोखला. यानंतर या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात संबंधित युवकाच्या बरगडीला जबर मार लागल्याचे म्हटले आहे. त्यामुळे युवकाला मारहाण करून त्याचा खून करण्यात आला का, असा संशय व्यक्‍त केला जात आहे.

मुकुंद अडागळे हा गुरुवारी दुपारी मद्य प्राशन करून घरासमोरच पडला होता. सायंकाळ झाल्यामुळे त्याला घरातील नातेवाईक व शेजार्‍यांनी उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. मुकुंद हा बेेशुद्ध झाल्याचे समजून शेजार्‍यांनी डॉक्टरांना बोलवले.

खासगी डॉक्टरांची मुकुंद याची तपासणी केली असता तो मयत झाल्याचे सांगितले. मुकुंदचा मृत्यू झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी संगम माहुली येथे त्याचा मृतदेह अंत्यविधीसाठी नेण्यात आला. याच दरम्यान सातारा शहर पोलिसांना मुकुंद याचा मृत्यू अकस्मिक नसून त्याचा घातपात करून मृत्यू झाल्याचा संशय आला. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ संगममाहुली येथे धाव घेत अंत्यविधी रोखला. यावेळी नातेवाईक व पोलिसांमध्ये शाब्दीक चकमक उडाली.

अखेरीस पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर त्यांनी मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिला. यानंतर सिव्हीलमध्ये पोलिस व वैद्यकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर हा मृतदेह अहवाल येईपर्यंत शुक्रवारी रात्रभर शवविच्छेदन गृहात ठेवला. अहवाल आल्यानंतर शनिवारी सकाळी हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर अंत्यविधी झाला.

पोलिसांना आलेला संशय अहवालातून खरा ठरल्याचे दिसून येत आहे. अहवालातील मिळालेल्या माहितीनुसार मुकुंद याच्या बरगडीला जबर दुखापत झाल्याचे समोर आले आहे. याव्यतिरिक्‍त अन्य काही माहिती समजू शकलेली नाही. या घटनेत मुकुंद याला कोणीतरी मारहाण केल्याची शक्यता आहे. मुकुंदला कोणी मारहाण केली? कोणत्या कारणातून केली? कधी केली? असे प्रश्‍न आता उपस्थित होत आहेत. या घटनेमुळे सातारा शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुकुंदचा मोठा भाऊ राकेश अडागळे याने सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अहवालातून काय उलगडणार?

मुकुंदच्या मृतदेहाचे विच्छेदन झाल्यानंतर त्याचा अहवाल पोलिसांना प्राप्‍त झाला आहे; मात्र त्याची सविस्तर माहिती अद्याप समजलेली नाही. मुकुंदच्या बरगड्यांना मार लागल्याचे म्हटले आहे. मात्र, इतर गोष्टींचा अद्याप उलगडा झाला नाही. त्यामुळे अहवालातील आणखी काय बाबी स्पष्ट होणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Back to top button