सातारा नगरपालिका : निम्म्या नगरसेवकांचे पत्ते होणार कट | पुढारी

सातारा नगरपालिका : निम्म्या नगरसेवकांचे पत्ते होणार कट

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : सातारा नगरपालिका मधील नगरसेवकांचा कार्यकाल गेल्या महिन्यात संपला. सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सातार्‍यात इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. स्वच्छ आणि राजकीयद‍ृष्ट्या सक्रिय राहतील अशा नव्या चेहर्‍यांना संधी दिली जाणार आहे. सातार्‍यात भाकरी फिरवली जाणार असल्याने 20 हून अधिक नगरसेवकांचे पत्ते कट होण्याची शक्यता आहे.

सातारा नगरपालिकेची 2016 मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली होती. या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दोन वॉर्डचा एक प्रभाग अशी रचना होती. त्यामुळे प्रभागात दोन नगरसेवकांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली; मात्र निवडणुकीत वॉर्डचा प्रभाग झाल्यामुळे अनेकांची गोची झाली होती. प्रभागात विस्तीर्ण परिसराचा समावेश असल्यामुळे मतदारांशी संपर्क साधणे नगरसेवकांना जिकिरीचे झाले. शहराचा विकास व्हावा या उद्देशाने दोन वॉर्डचा एक प्रभाग झाला; मात्र सातार्‍यात विरोधाभास पाहायला मिळाला. नगरसेवकांकडून अपेक्षित कामकाज झाले नाही. नागरिकांच्या समस्या, मागण्यांबाबत टोलवाटोलवी झाली.

प्रभागातील दुसरा सहकारी नागरिकांची कामे करेल याच भूमिकेत बरेच नगरसेवक होते. याचा ताण काम करणार्‍या नगरसेवकांवर आला. काही प्रभागातील नगरसेवक निवडणूक झाल्यानंतर पुन्हा फिरकेलच नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. प्रभागात काम करणार्‍या ठेकेदाराला टक्केवारीसाठी धमकावण्याचे प्रकारही झाले. सदर बझारमध्ये टक्केवारीसाठी नगरसेवकांमध्ये कळवंड झाली होती. टर्म संपली तरी काही नगरसेवकांना एकूण कार्यकालाइतकी कामेही प्रभागात करता आलेली नाहीत.

खाबुगिरी, निष्क्रियता, अकार्यक्षमता, उदासिनता, नागरिकांना गृहित धरण्याची नगरसेवकांची मानसिकता आगामी काळात नेत्यांना अडचणीची ठरण्याची शक्यता असून त्यामुळे आघाड्यांचे राजकीय नुकसान होण्याचा संभव आहे. पदे देवूनही काहीजणांना अपेक्षित कामकाज करता आले नाही. ‘मीटर’ सुरु रहावा, यासाठीच काहीजण सभापतीपदाला चिटकून राहिले. शेवटच्या टप्प्यात सर्वच सभापतीपदे महिलांना देण्यात आली.

मात्र त्यांचा कारभार कळसूत्री बाहुल्यांसारखा राहिला. त्यांच्या पतींच्याच नगरपालिकेत उचापती राहिल्या. नागरिक गार्‍हाणे घेवून आल्यावर मुदत संपली असे सांगणारे काहीजण तर अजूनही त्या-त्या विभागात चकरा घालताना दिसतात. ही परिस्थिती निवडणूक काळात नेतेमंडळींना अडचणीची ठरु शकते. त्यामुळे सातारा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत नेतेमंडळी भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहेत.

काही नगरसेवकांनी प्रभागांत उठावदार कामे केली आहेत. कोरोना संसर्ग काळात फिल्डवर जावून लोकांना दिलासा दिला आहे. लॉकडाऊन काळात अन्नधान्याची किट वाटणे, कोव्हिड केअर सेंटर सुरु करणे, गोळ्या-औषधांचे वाटप, ऑक्सिजन मशिन पुरवणे, लसीकरण करणे आदि कामे झोकून देवून केली. प्रभागातही वैशिष्ट्यपूर्ण कामे मार्गी लावली.

काही नगरसेवकांची पहिलीच टर्म असताना त्यांनी विकासकामांतून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. मात्र काही नगरसेवक निष्क्रिय राहिले. आयत्या पिटावर रेघोट्या मारण्याचे त्यांनी काम केले. प्रभागात कुठले विकास काम सुरु झाले की फोटोसेशन करुन ते व्हायरल करण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत. या सर्व बाबी नागरिक जाणून आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काहीजणांनी गंमती-जंमती केल्या आहेत.

नगरपालिका निवडणुकीत नेतेमंडळी रात्रंदिवस झटत असताना लोकसभा-विधानसभा निवडणुकीवेळी काही नगरसेवकांचे रुसवे-फुगवे सुरु होते. काहीजण निमित्‍त काढून परगावी गेले. कोपरा सभा घेणेही त्यांनी टाळले. याही बाबी विचार करायला लावणार्‍या आहेत. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत अशा नगरसेवकांना डच्चू मिळणार हे स्पष्ट आहे.

सातारा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत स्वच्छ, कार्यक्षम, सक्रिय अशा इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. इच्छुकांच्या कच्च्या याद्याही तयार झाल्याची जोरदार चर्चा आहे. या यादीमध्ये मातब्बरांच्या नावांचा समावेश नाही. सातारा पालिकेत सध्या 40 नगरसेवक आहेत. ही संख्या आगामी निवडणुकीत वाढून 50 होणार आहे.

मात्र 40 नगरसेवकांपैकी निम्म्याहून अधिक नगरसेवकांना यावेळी तिकीटे मिळणार नाहीत, असे चित्र आहे. नगरपालिका निवडणुकीत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर बदल केले जाणार आहेत. याची कुणकुण नगरसेवकांना लागल्याने अनेकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. निवडणुकीत तिकीट आपल्यालाच मिळावे, यासाठीही काही नगरसेवक प्रयत्नशील आहेत.

बंडखोरीची शक्यता…

आगामी सातारा नगरपालिका निवडणुकीत जोरदार सामना पाहायला मिळणार आहे. मनोमीलन होणार नसल्याने दोन्हीही आघाड्या आमने-सामने आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनेही या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आघाड्यांकडून विद्यमान नगरसेवकांचे पत्ते कापले गेल्यास बंडखोरी होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेला त्याचा फायदा होऊ शकतो. ही राजकीय परिस्थिती ओळखून आघाड्यांना सावध भूमिका घ्यावी लागणार आहे.

Back to top button