सांगली : 'या' गावात शेपूची भाजी का खात नाहीत? - पुढारी

सांगली : 'या' गावात शेपूची भाजी का खात नाहीत?

संतोष कणमुसे; पुढारी ऑनलाईन : ग्रामीण महाराष्ट्र हा अनेक रंजक कथांनी आणि दंतकथांनी रंगलेला आहे. इथल्या प्रत्येक गावचा वेगळा इतिहास असतो. त्यातून रिती-रिवाज, परंपरा या आजही हजारो वर्षं उलटली तरी अव्याहतपणे सुरूच असतात. असंच एक गाव आहे ऐतवडे खुर्द. हे गाव सांगली जिल्ह्यातलं. या गावातली परंपराच नाही, तर इतिहासच भन्नाट आहे. या गावातली लोकं आपल्या जेवणात शेपूची भाजी च खात नाहीत. या आगळ्या वेगळ्या प्रथेमागे कोणता इतिहास आहे, हे जाणून घेऊया…

आम्ही या गावचा इतिहास जाणून घेण्यासाठी याच ऐतवडे खुर्द गावातील वयस्क बाबासाहेब पाटील यांना गाठलं. बाबासाहेब सांगतात की, “आमच्या गावात शेपूची भाजी पिकवतात. पण, खात नाहीत. कारण, आम्ही या भाजीला देव मानतो. कारण, शेपूची भाजी होती म्हणून आम्ही आज जिवंत आहोत. भाजीचा इतिहास मुघल काळातील आहे. या काळात पूर्वी गावं जिंकण्याची पद्धत होती.”

“आमच्या गावाला तिन्ही बाजुंनी वारणा नदी आहे. त्यामुळे हिरवागार आहे. त्यामुळे गावातील गरजा गावातून भागल्या जात होता. त्या अर्थी गाव स्वावलंबी होतं. त्यामुले या गावावर सर्वांचा नजरा होत्या. हे गाव आपल्या अख्त्यारित असायला पाहिजे, असं त्यावेळी वर्चस्ववादी लोकांना वाटायचं. ऐतवडे खुर्द हे गाव खरंतर पाटील यांच्याकडे होतं”, असं बाबासाहेब सांगत होते.

ते पुढे सांगतात की, “पूर्वी दळवी आणि पाटील यांच्यात वाद होता. हा वाद पराकोटीला गेला अन् त्याचं पर्यवसन युद्धात झालं. दळवी गटातील लोकांनी पाटील बेसावध असताना त्यांच्यावर हल्ला केला. या गावातील सर्व पुरुषांनाच त्यांनी मारून टाकले. पण, या युद्धात एक लहान मुलगा वाचला. त्या मुलाला एका बाईने शेपूच्या टोपलीत लपवून त्याच्या मामाच्या घरी आणून सोडले.”

“त्या मुलाच्या मामाचे गाव होते तुळजापूर

“त्या मुलाच्या मामाचे गाव होते तुळजापूर. ते तुळजापूर येथील गायकवाड घराण्यातील होते. कोल्हापुरातील ज्योतिबाच्या यात्रेला आजही काही लोक तुळजापुरमधील लोक येतात. त्यांची व्यवस्था ऐतवडे खुर्द या गावात आवर्जुन केली जाते. आजही त्यांची राहण्याची, खाण्यापिण्याची सोय केली जाते. बरं कथा अशी आहे की, तुळजापुरातली एका मुलीचं लग्न ऐतवडे खुर्दमधील एका मुलाशी करण्यात आले”, अशी कथा पुढे-पुढे बाबासाहेब पाटील सांगत राहिले.

“पाटलांच्यातील वाचलेल्या मुलाने १८ वर्षांनतर दळवींवर हल्ला केला आणि ऐतवडे खुर्द गाव जिंकून घेतले. यामध्ये या मुलाला त्याच्या तुळजापूरच्या गायकवाड मामांनी मदत केली. आजही या गावात पाटील यांचे तुळजापरचे मामा म्हणजेच गायकवाड आहेत. ते गावात राहतात. त्यांना त्यावेळी गावातच जमीन दिली आहे. तर ही कथा शेपूच्या भाजीमुळे घडली आणि तो मुलगा केवळ शेपुच्या भाजीमुळे वाचला. ऐतवडे खुर्द गावातील हा मुलगा म्हणजे शेवटचा पाटील वाचला म्हणून शेपूच्या भाजीला इथले लोक देव मानतात.  त्या भाजीला कधीच खात नाही. या गावात शेपूची भाजी पिकवली जाते. पण, खाल्ली जात नाही, यामागे ही मोठी कथा आहे”, शेपूच्या भाजीमागील ही रंजक कथा बाबासाहेब पाटील यांनी सांगितली.

हेही वाचलत का :

Back to top button