सांगली महापौरांना विनामास्क प्रकरणी पोलिसांचीसुचना - पुढारी

सांगली महापौरांना विनामास्क प्रकरणी पोलिसांचीसुचना

सांगली : पुढारी वृत्तसेवा : कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणेकडून आज दुसर्‍या दिवशीही मोहीम सुरुच होती. मास्क वापरण्याबाबत जागृती करीत अनेकांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. महापौर दिग्वीजय सूर्यवंशी व नगरसेवक विष्णू माने यांनाही मास्क न वापरल्याबद्दल पोलिसांनी ‘अलर्ट’ केले.

 कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी नियमाचे पालन करण्यासंदर्भात आवाहन करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी संबंधीतांना दिले आहेत. त्याप्रमाणे शहरात आज दुसर्‍या दिवशीही पोलिसांकडून मोहीम राबवण्यात आली.
सांगली शहर, विश्रामबाग आणि संजयनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुख्य चौकात अनेक विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई करण्यात आली.

त्याशिवाय कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत का? त्याचे प्रमाणपत्र आहे का? याची तपासणी करण्यात येत होती. अनेक ठिकाणी पाचशे रुपये प्रमाणे दंड वसूल करण्यात आला. विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस निरीक्षक कल्लापा पुजारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित पाटील यांच्या पथकाने मोहीम राबवली.

सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांच्या नेतृत्वाखाली शहर परिसरातील मुख्य चौकात ठिकठिकाणी मास्क बाबत जागृती करण्यात येत होती. संजयनगर पोलिस ठाण्याचे प्रमुख संजय क्षीरसागर यांच्या पथकाने ठिक-ठिकाणी मोहीम राबवली.

Back to top button