गोवा : परदेशातून येणार्‍यांची होणार चाचणी : प्रमोद सावंत | पुढारी

गोवा : परदेशातून येणार्‍यांची होणार चाचणी : प्रमोद सावंत

पणजी; पुढारी वृत्तसेवा : परदेशी प्रवाशांची सरसकट कोरोना तपासणी करणे व केंद्र सरकारने निर्बंध घातलेल्या 12 देशातील नागरिकांना सरसकट 7 दिवस विलगीकरणात ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन विषाणूचा प्रवेश गोव्यात होऊ नये व झाल्यास कोणत्या उपाय योजना आखाव्यात यावर विचार विनिमय करण्यासाठी मुख्यमंत्र्यानी मंगळवारी 30 रोजी उच्चस्तरीय बैठक घेतली.

आल्तिन्हो पणजी येथील वन भवनात झालेल्या या बैठकीला आरोग्य खात्याचे सचिव व इतर आरोग्य अधिकारी तसेच मुरगाव बंदर न्याय व दाबोळी विमानतळ प्रधिकरण यांचे अधिकारी तसेच इतर समंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते. केंद्र सरकारने यापूर्वीच ज्या 12 देशात ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत त्या देशातील नागरिकांना भारतात येण्यावर अनेक निर्बंध लादले आहेत. गोव्यात परदेशातून विमानमार्गे किवा जहाज मार्गे आलेल्यांची सक्तीने चाचणी केली जाणार आहे.

चार्टर विमानाबाबत केंद्र सरकार बुधवारी 1 डिसेंबर रोजी नवी नियमावली जाहीर करणार आहे. असे सांगून आजच्या बैठकीत परदेशातील प्रत्येक नागरिकांची सक्तीनी तपासणी करणे व त्या 12 देशाच्या नागरिकांना सरळ आयसोलेटेड करण्याचे आदेश विमानतळ व बंदर अधिकार्‍यांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मंगळवारी कोरोना मृत्यू नाही

गोव्यात 30 रोजी 38 नवे कोरोना बाधित सापडले, तर 30 कोरोना बाधित बरे झाले आहेत. मंगळवारी दिवसभरात कोरोनामुळे एकाही व्यक्तीचे निधन झाले नाही. त्यामुळे राज्यासाठी तो एक दिलासा देणारा क्षण ठरला. राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 284 आहे. दरम्यान आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार दिवसभरात 3,540 लेकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्यामुळे राज्यात आतापर्यंतचे लसीकरण 22 लाख 90 हजार 458 इतके झाले आहे.

Back to top button