नगरसेवकांच्या लेटरपॅड छपाई खर्चाच्या वसुलीसंदर्भात दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. दाव्याच्या अनुषंगाने दिवाणी न्यायालयात दि. 30 नोव्हेंबर रोजी जबाब होणार आहेत, अशी माहिती नागरिक हक्क संघटनेचे कार्यवाह वि. द. बर्वे यांनी दिली.
बर्वे म्हणाले, महापालिकेच्या स्थापनेपासून ते सन 2012 पर्यंत नगरसेवकांच्या लेटरपॅड छपाईचा खर्च महापालिकेच्या निधीतून केला आहे.
वास्तविक नगरसेवकांना मिळणार्या मानधनातून त्यांनी हे लेटरपॅड छपाई करून घेणे आवश्यक होते. सन 2012 मध्ये लेखापरीक्षणात त्याबाबत आक्षेपही घेण्यात आलेला आहे. 159 नगरसेवकांवर सुमारे 7 लाख रुपयांची वसुलीही लावली होती. विद्यमान 20 नगरसेवकांचाही त्यात समावेश आहे.
बर्वे म्हणाले, सन 2018 मध्ये महापालिकेची निवडणूक झाली आहे. ज्यांच्यावर वसुली लागली आहे, त्यापैकी काहींनी निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यावेळी त्यांच्याकडून वसूलपात्र रक्कम वसूल करणे आवश्यक होते. त्यातील 20 उमेदवार निवडून आले.
विद्यमान 20 पैकी 2 नगरसेवकांनी वसूलपात्र रक्कम भरली आहे, मात्र 18 नगरसेवकांनी ही रक्कम भरलेली नाही. त्यामुळे या 18 नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी याचिकेत केली आहे. महापालिकेचे आयुक्त प्रतिवादी आहेत.
सांगली : प्रतिनिधी
महापालिकेतील विविध घोटाळ्यांप्रकरणी चौकशी व कारवाईसाठी ईडीला निवेदन दिलेले आहे. राज्यपालांनाही निवेदन दिले होते. राज्यपालांनी हे पत्र शासनाच्या नगरविकास विभागाला पुढील कार्यवाहीसाठी पाठविले आहे, अशी माहिती वि. द. बर्वे यांनी दिली.