सांगली : किरकोळ वादातून गुंडाचा निर्घृण खून | पुढारी

सांगली : किरकोळ वादातून गुंडाचा निर्घृण खून

सांगली; पुढारी वृत्तसेवा : क्षुल्लक कारणावरून अश्विनकुमार मल्हारी मुळके (वय 32, रा. नवीन वसाहत, सांगली) या गुंडाचा धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृण खून करण्यात आला. यावेळी त्याचा साथीदार गणेश महादेव हाताळे (28) हा गंभीर जखमी झाला. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण व विश्रामबाग पोलिसांनी या गुन्ह्याचा अवघ्या 12 तासात छडा लावत सात संशयितांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये अजय ऊर्फ अजित पांडुरंग खोत (23), कुणाल प्रशांत पवार (22), अमोल गंगाप्पा कुंचीकोरवी (28), विकी प्रशांत पवार (26), अर्जुन हणमंत पवार (23, वडर कॉलनी, सांगली), सुजित दादासाहेब चंदनशिवे (29, नवीन वसाहत) व गणेश रामाप्पा ऐवळे (36, गोकुळनगर, सांगली) यांचा समावेश आहे. त्यांना आज (शुक्रवार) न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. मुळके याच्या घरासमोर सार्वजनिक शौचालय आहे. बुधवारी रात्री तो व त्याचा साथीदार गणेश हाताळे तेथे बोलत बसले होते. त्याचवेळी विकी पवार हा तेथून दुचाकीवरून निघाला होता. मुळकेने त्याला थांबवून, ‘तू येथून जाऊ नकोस, इथं शौचालय आहे’, असे सांगितले. यावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. यावेळी दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली.

त्यानंतर विकी तेथून निघून गेला व त्याने त्याच्या साथीदारांना घडलेला प्रकार सांगितला. विकीसह सातजण हातात धारदार शस्त्रे घेऊन आले. त्यांनी मुळकेवर जीवघेणा हल्ला केला. त्याला वाचविण्यासाठी गणेश पुढे गेला असता, त्याच्यावरही हल्ला केला. यामध्ये दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना मुळकेचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला.

मृतासह हल्लेखोरांवर गंभीर गुन्हे

मृत मुळके याच्याविरुद्ध मारामारीसह अन्य गुन्हे दाखल आहेत. तसेच अटकेत असलेल्या संशयितांविरुद्धही खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. काहीजणांना मोका कायदाही लागला होता. यातून ते तीन महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आले आहेत.

Back to top button